भाजपच्या BOT मोहिमेला धक्का; सातबाऱ्यावर महापालिकेचे नावच नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nmc

भाजपच्या BOT मोहिमेला धक्का; सातबाऱ्यावर महापालिकेचे नावच नाही

नाशिक : बांधा, वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर सत्ताधारी भाजपच्या वतीने शहरातील मोक्याच्या जागा विकसित करण्याच्या मोहिमेला धक्का बसला आहे. कमलेश कन्सल्टन्ट ॲण्ड धामणे-देवरे आर्किटेक्ट या सल्लागार संस्थेने, विकसित करावयाच्या जागा महापालिकेच्या नावावरच नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे.

मिळकती ताब्यात मात्र सरकार दरबारी नोंदच नाही

निवडणुकीला जेमतेम चार महिने शिल्लक असताना सत्ताधारी भाजपने महापालिकेच्या मालकीच्या २२ पैकी मोक्याच्या ठिकाणी असलेल्या अकरा मिळकती बांधा, वापरा व हस्तांतरीत करा (BOT) या तत्वावर विकसित करण्याचा निर्णय गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये घेतला होता. त्यासाठी कन्सल्टन्सी नियुक्त करण्याचा प्रस्ताव जादा विषयांमध्ये घुसविला. त्यानंतर मागील महिन्यात झालेल्या महासभेत सुचक, अनुमोदक असलेले माजी सभागृह नेते सतीश सोनवणे व माजी गटनेते जगदीश पाटील यांचा प्रस्ताव जादा विषयात मंजुर केला. मागच्या दाराने प्रस्ताव मंजुर केल्याने शिवसेनेसह राष्ट्रवादी, कॉंग्रेस व मनसेने टिकेची झोड उठविली. शिवसेनेने शासनाकडे धाव घेतली तर, अन्य पक्षांनी आंदोलन छेडण्याचा ईशारा दिला. प्रशासनावर देखील संशय व्यक्त केला गेल्याने आयुक्त कैलास जाधव यांनी सल्लागार संस्थेला यापुर्वी दिलेले काम रद्द करून नवीन सल्लागार संस्थेसाठी निविदा प्रक्रिया राबविली. एकीकडे बीओटीच्या विषयावरून वाद सुरु असताना कमलेश कन्सल्टंट अँड धामणे- देवरे आर्किटेक्ट या सल्लागार संस्थेने महापालिकेला पत्र पाठवून विकसित करावयाच्या एकुण मिळकतींपैकी आठ मिळकतींच्या सात-बारा उताऱ्यावर महापालिकेचे नाव नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे. संबंधित संस्थेने बीओटीवर मिळकती विकसित करण्याचा अहवाल तयार करण्यापुर्वी सदरच्या मिळकती महापालिकेच्या ताब्यात असल्या, तरी सरकार दरबारी म्हणजे ‘सातबारा’वर नाव आहे का ही बाब तपासली. त्यात आठ मिळकतींच्या सातबारा उताऱ्यावर महापालिकेचे नावच नसल्याचे आढळले.

हेही वाचा: शहरी भागातही आता नवीन स्वस्त भाव धान्य दुकाने!

या मिळकती सापडल्या वादात

जुने नाशिकमधील भद्रकाली फ्रुट मार्केटच्या सातबारा उताऱ्यावर नाशिक नगरपालिका असा उल्लेख आहे. गोल्फ क्लब मैदानावरील पार्किंगच्या जागेवर सरकारी जमीन असा उल्लेख आहे. बॉईज टाऊनजवळच्या जलधारा वसाहतीच्या सातबाऱ्यावर नासिक डायोसेशन ट्रस्टचे नाव आहे. राजीवनगर भागातील सर्वे क्रमांक १०१३ वर भगतसिंगनगर झोपडपट्टी आहे. त्या जागेच्या उताऱ्यावर सरकारी दगडखाण असा उल्लेख आहे. याचाच अर्थ महापालिकेच्या मालकी नसल्याचे स्पष्ट होते. नाशिक रोडच्या जवाहर मार्केट या जागेवर नाशिक रोड- देवळाली नगरपालिकेचे नाव आहे. भद्रकाली स्टॅन्डच्या मिळकतीवर नाशिक म्युनिसिपालिटी तर, पंचवटी भांडाराच्या जागेवर अध्यक्ष नवीन समिती नाशिक, नाशिक रोडच्या महात्मा गांधी टाऊन हॉलच्या मिळकतीवर नाशिक रोड नगरपालिका देवळाली टाऊन हॉल असा उल्लेख आहे. सातपूर टाऊन हॉलच्या मिळकतीवर सातपूर नगरपालिका, नाशिक रोडच्या सुभाष रोड शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या सातबारा उताऱ्यावर नाशिकरोड नगरपालिका असा उल्लेख आहे.

हेही वाचा: JSW कंपनीचा राज्य शासनासोबत करार; रोजगार होणार उपलब्ध

उताऱ्यावर असावा स्पष्ट उल्लेख

महापालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकामाची परवानगी देताना विकासकाचे नाव सातबारा उताऱ्यावर असणे बंधनकारक आहे. त्याच नियमानुसार महापालिकेला विकसित करावयाच्या मिळकतींच्या सातबारा उताऱ्यावरदेखील नाशिक महापालिका असा उल्लेख असणे गरजेचे असल्याने सातबारा उताऱ्यावरील दुरुस्तीनंतरच या मिळकती विकसित करता येणार असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.

Web Title: Bjps Bot Proposal Trouble Nashik Municipal Corporation Political

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top