Nashik Crime News : घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार; चोरीछुप्याने वाहनांमध्ये भरला जातो गॅस

Gas Cylinder News
Gas Cylinder Newsesakal

नाशिक : घरगुती वापरासाठी लागणाऱ्या गॅस सिलिंडरचे दर दिवसागणिक गगनाला भिडत असताना, दुसरीकडे याच घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. चोरीछुप्या रीतीने हॉटेल व्यावसायिकांकडून तर वापर केला जातोच, याशिवाय वाहनांमध्येही सीएनजी गॅस ऐवजी घरगुती गॅस भरून देण्याचे अड्डे सुरू आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये शहर पोलिसांनी धाडी टाकून पंचवटी व नाशिक रोड हद्दीतील अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. त्यावरून घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार अधोरेखित होत आहे. (Black market of domestic gas cylinders Gas secretly filled in vehicles Nashik Crime News)

गेल्या आठवड्यात नाशिक रोड हद्दीमध्ये चोरीछुप्यारितीने वाहनांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा गॅस वाहनातून भरला जात असताना नाशिक रोड पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. त्यापूर्वीही पंचवटी, आडगाव हद्दीमध्ये अशारीतीने पोलिसांनी कारवाई केली होती.

पोलिसांकडून धडक कारवाई केली जात असतानाही शहरात आड मार्गावर आणि आडोशाला अशारीतीने गॅसचा काळाबाजाराचे अड्डे थाटले आहेत. घरगुती वापरासाठीच्या गॅस सिलिंडरचे दर एक हजार रुपया पलिकडे पोचले आहेत.

व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचे दर याहिपेक्षा अधिक आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचे दर त्या तुलनेने कमी आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांकडून चोरीछुप्या रितीने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा वापर केला जातो.

बऱ्याचदा रस्त्यालगत असलेल्या चहा टपऱ्या, वडापावाच्या गाड्याच्या ठिकाणीही घरगुती सिलिंडरचा वापर करताना ते सिलिंडर झाकले जाते. जेणेकरून ते कोणाला दिसू नये. त्यामुळे व्यावसायिकाला काही प्रमाणात आर्थिक फायदा होतो. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून गॅसवर धावणारी वाहने आली आहेत.

अलीकडे गॅसवर धावणाऱ्या वाहनांसाठी सीएनजी गॅस पंपही सुरू झालेले आहेत. असे असतानाही घरगुती गॅस सिलिंडरचा वापर वाहनांसाठी केला जातो. शहरात आडमार्गावर असे अड्डे थाटलेले आहेत.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Gas Cylinder News
MBA-CET Exam : एमबीए-सीईटी परीक्षेच्‍या नोंदणीची या तारखेपर्यंत मुदत

या ठिकाणी शहरातील गॅस वितरकांकडे घरपोच सिलिंडर पोहाच करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला हाताशी धरून त्याच्याकडून घरगुती गॅस सिलिंडर मिळविले जातात. इलेक्ट्रिक पंप मशिनच्या मदतीने गॅस वाहनांमध्ये भरला जातो.

गॅस चोरीचे रॅकेट

शहरात घरगुती गॅस सिलिंडर घरपोच करणाऱ्या शेकडो गाड्या आहेत. या वाहनांवरील डिलिव्हरी बॉयमार्फतच गॅस सिलिंडर गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांपर्यंत पोचतो. घरगुती सिलिंडरचे सील न उघडता त्यातून इलेक्ट्रिक मशिनच्या साहाय्याने गॅस चोरी केली जाते.

एका सिलिंडरमधून सरासरी एक किलो गॅस चोरला जाऊन १४ सिलिंडरमधून अशारीतीने गॅस चोरून काळा बाजारात विक्रीसाठी एक सिलिंडर उपलब्ध होते. एका गॅस सिलिंडरमधील गॅस वाहनात भरला तर ते वाहन किमान २५० किलोमीटर अंतर धावते.

हे प्रमाण सीएनजी गॅसपेक्षा अधिक असल्याने वाहनचालक गॅस सिलिंडरचा गॅस वापरण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे शहरात सिलिंडरमधील गॅस चोरीमागे डिलिव्हरी बॉयचे मोठे रॅकेट असल्याचे अनेकदा समोर आलेले आहे.

गॅसचे दर

घरगुती गॅस सिलिंडरचे दर (१४.२ किलो) : १०७५ रुपये

वाहनांसाठीच्या गॅसचे दर (१ किलो) : ९२.५० रुपये

"गेल्या काही दिवसांमध्ये शहर गुन्हेशाखा आणि पोलिस ठाण्याकडून गॅस सिलिंडरचा काळाबाजार सुरू असलेल्या अड्ड्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. असे प्रकार आणखी कुठे सुरू असतील तर नागरिकांनी थेट पोलिसांशी संपर्क साधावा. त्यांचे नाव गुप्त राखले जाईल." - प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, शहर गुन्हे शाखा.

Gas Cylinder News
Nashik Political News : मनपाच्या ‘बाकड्या’ वरून लोकप्रतिनिधी ‘वाकड्या’त! पंचवटीतील ‘त्या’ गोष्टींची चर्चा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com