Nashik Cyber Crime : अश्‍लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेलिंग; महिलांची खास टोळी सक्रिय! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

video call blackmailing

Nashik Cyber Crime : अश्‍लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेलिंग; महिलांची खास टोळी सक्रिय!

नाशिक रोड : सध्या ऑनलाइन आर्थिक गंडा घालणारी टोळी सर्वत्र सक्रिय आहे. मात्र नाशिक शहरात फेसबुक व व्हॉट्सॲपद्वारे पुरुषांशी संपर्क साधून विवस्त्र होऊन व्हिडिओ कॉलिंग करणाऱ्या महिलांची टोळी सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. ही महिलांची टोळी पुरुषांना शारीरिक आकर्षण दाखवून त्यांनाही तसे अंगविक्षेप करायला लावून ऑनलाइन रेकॉर्डिंगद्वारे व्हिडिओ काढून घेते. त्यानंतर त्यांच्याकडून पैशाची मागणी केली जाते. नाशिकमधील अनेक मुले व पुरुषांनी भीतीपोटी या महिलांना घाबरून पैसे देऊ केल्याच्या घटना उघड होत आहेत. मात्र पोलिस दप्तरी तक्रार करायला पुरुष घाबरत आहेत. (Blackmailing through obscene videos special group of women active Nashik Cyber ​​Crime)

नाशिक शहरात रोज किमान पाच पुरुष ऑनलाइन चॅटिंगद्वारे महिलांच्या जाळ्यात अडकत आहेत. या महिला पश्चिम बंगाल अथवा राजस्थानमधील असाव्यात, असा फसवणूक झालेल्या पुरुषांचा दावा आहे. व्हॉट्सॲपवरून या महिला पुरुषांशी चॅटिंग करतात, त्यानंतर त्या विवस्त्र होतात. त्यानंतर पुरुषांनाही कपडे काढायला सांगतात आणि या संबंध घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण करून घेतात.

त्यानंतर या पुरुषांनाच या महिला काही तासाने फोन करून त्यांच्याकडे पैशांची मागणी करतात, अन्यथा अश्‍लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देतात. पैसे दिले नाही, तर अनेकदा या महिलांनी इतरांना व्हिडिओ पाठवले आहेत. भीतीपोटी या गंभीर घटनेची पुरुष पोलिस दप्तरी तक्रार देत नाही. पर्यायाने अशा प्रकारची गुन्हेगारी वाढत आहे, रोज किमान पाच लोक या फसवणुकीला बळी पडत असून, या सायबर गुन्ह्याचे सत्र नाशिक शहरातही वाढत आहे.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

हेही वाचा: Nashik Crime News : नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची आर्थिक फसवणूक करणारा तोतया आर्मी अधिकारी अटकेत

बिनधास्त करा तक्रार

यासंदर्भातफसवणूक झालेल्या पुरुषांनी ‘सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल’ या वेबसाइटवर तक्रार नोंदवायला हवी, असे आवाहन सायबर विभागाचे पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी केले. अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर टाकू शकत नाही. कोणी ब्लॅकमेल करत असेल, तर पोलिस दप्तरी नोंद करा. कोणाच्याही आमिषाला बळी पडू नका. आजपर्यंत दोन महिन्यांत या संदर्भात एकही तक्रार आलेली नाही, असे पोलिस निरीक्षक सूरज बिजली (सायबर क्राइम) यांनी सांगितले.

"सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप हाताळताना अनोळखी व्यक्तीशी कोणीही चॅटिंग करू नये. ते विचारत असलेल्या माहितीला प्रतिसादही देऊ नये. समोरची व्यक्ती अश्लील मेसेज पाठवत असल्यास तत्काळ सायबर क्राइम विभागाला लेखी तक्रार द्यावी. अनोळखी व्यक्ती मेसेज करत असेल, तर त्याचा नंबर सरळ ब्लॉक करून टाकावा."- रमेश कुशारे, कायदेतज्ज्ञ

"शक्यतो समोरच्याला व्हॉट्सॲपवर प्रतिसाद देणे टाळावे. आपले व्हॉट्सॅप हॅक झाले आहे का, हे तपासून घ्यावे. व्हिडिओ चॅटिंग झाल्यास संबंधित घटनेचे चित्रीकरण करून घ्यावे आणि सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलकडे तक्रार टाकावी. सध्या असे फसवणुकीचे प्रकार रोज घडत आहेत, पुरुषांनी याबाबत दक्षता घ्यावी."-भूषण देसाई, सायबरतज्ज्ञ

हेही वाचा: Gram Panchayat Election Result : सिन्नरला ग्रामपंचायत निवडणुकीत वाजे गटाचा डंका!