Latest Marathi News | तुलसी आणि वाल्मीकी रामायणाचे मिश्रण गांधीनगरच्या रामलीला सादरीकरणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Scene between Ramleela

Nashik : तुलसी आणि वाल्मीकी रामायणाचे मिश्रण गांधीनगरच्या रामलीला सादरीकरणात

नाशिक रोड : एक श्लोकी रामायणात संपूर्ण रामलीला अर्थ सामावलेला आहे. गांधीनगरच्या मैदानावर तुलसी आणि वाल्मीकी रामायणाचे मिश्रण असलेल्या रामलीलाचे सादरीकरण केले जाते. एखादी गोष्ट चार शब्दात आणि चार वाक्यात सांगायची ठरल्यास संस्कृत भाषेतून छान मांडता येते.

आदौ राम तपोवनादि गमनं, हत्वा मृगं कांचनम्।

वैदीहीहरणं जटायुमरणं, सुग्रीवसंभाषणम्।।

बालीनिर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरीदाहनम्।

पश्चाद् रावण कुम्भकर्ण हननम्, एतद्धि रामायणम्।।

या संस्कृत श्लोकातून संपूर्ण रामायणाचा अर्थबोध सामावलेला आहे. अर्थात, प्रभू रामचंद्र वनवासात गेले, तेथे त्यांनी सोन्याच्या हरणाचा वध केला. रावणाने सीतेचे अपहरण केले, जटायूचा रावणाने वध केला. प्रभू श्रीराम आणि सुग्रीव यांची मैत्री झाली. प्रभू श्रीराम यांनी बळीचा वध केला. समुद्र पार केला. लंका जाळली. त्यानंतर रावण आणि कुंभकर्णाचा वध झाला. (blend of Tulsidas Valmiki Ramayana in Ramleela performance of Gandhinagar dasara festival 2022 Nashik Latest Marathi News)

रामायण म्हणजे मानवाला चांगली तत्त्व आचार-विचार शिकवत संस्कार देते. हे संस्कार घेऊन गांधीनगर वसाहतीची स्थापना झाल्यानंतर कामानिमित्त देशभरातून आलेल्या विविध जाती धर्मीयांचे वास्तव्य झाले. त्यातील काही उत्तर भारतीय, गढवाली समाज व महाराष्ट्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रामलीलेची मुहूर्तमेढ रोवली.

१९५३-५४ या दोन्ही वर्षी गांधीनगर वसाहतीमधून प्रभू श्रीराम, लक्ष्मण वेशभूषा केलेल्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येत असे. नारायण मल्होत्रा व सुकदेव मल्होत्रा हे बंधू प्रभू श्रीराम व लक्ष्मणाची वेशभूषा करायचे. दोन्ही वर्षी परिसरातून मिळालेल्या प्रतिसाद व प्रोत्साहनामुळे १९५५ मध्ये नाट्यस्वरूपात रामलीलेचे सादरीकरण सुरू झाले.

प्रारंभी काही वर्षे जसवंतसिंग यांच्या उर्दू रामायणाचा आधार घेत रामलीला सादर करण्यात आली. तथापि विविध समाजातील जनतेला उर्दू संवाद समजण्यात अडचण येत होती. त्यामुळे सुरेंद्रसिंह बिष्ट व देविलाल शर्मा यांनी वाल्मीकी रामायण व तुलसी रामायण यांचा एकत्रित मेळ साधत रामलीलेचा हिंदी अनुवाद केला. यामध्ये (स्व.) ब्रह्मदेव कुलथे व (स्व.) कृष्णा गवांदे यांनी सुमधुर गीतरचना करून त्याला शास्त्रीय गायकीचा साज चढविला.

नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्‍या माळेपासून ते दसऱ्‍यापर्यंत रामलीलेचे सादरीकरण होते. दहा दिवसात रावणाचा पूर्वेतिहास, रावण कुंभकर्ण, बिभीषण वरदान, वाल्मीकी, प्रभू रामचंद्रांचा जन्म, सीतामाई जन्म, सीतामाई स्वयंवर, अंगद-रावण संवाद, हनुमान-रावण संवाद, बिभीषध निष्कायन, राम-सुग्रीव मित्रता, सीताहरण, अशोक वाटिका, लक्ष्मण-दंद्रजीत युद्ध आदी प्रसंगांचे सादरीकरण करण्यात येते.

हेही वाचा: Minister Dada Bhuse NMC Meeting : योजना जुन्याच, मात्र नव्या स्वरूपात

६६ वर्षांची अखंड परंपरा

रामलीला सादरीकरणाची परंपरा गेल्या ६६ वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. कित्येक कुटुंबातील तिसरी-चौथी पिढी रामलीलामध्ये योगदान देत आहे. सर्व तंत्रज्ञ, कलावंत विनामोबदला काम करतात, हेच या रामलीलेच्या यशस्वीतेचे गमक ठरले आहे. हिंदी संवाद व आवश्यक त्या ठिकाणी शास्त्रीय रागांवर आधारित गीतांमुळे प्रेक्षक तल्लीन होतात. गांधीनगर प्रेसमधील अधिकारी हरीलाल यांनी १९६० मध्ये रामलीला समितीची स्थापना केली.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता सरदार महेंद्रसिंग हे पहिले अध्यक्ष होते. १९५९ ते १९६५ या काळात गांधीनगर येथील वेल्फेअर क्लब हॉलमध्ये रामलीलेचे सादरीकरण होत असे. याच दरम्यान, एकदा फिरत्या रंगमंचावर काही दृश्यांचे सादरीकरण करण्यात आल्याचे काही जुने कलावंत सांगतात.

सीतामाई स्वयंवराच्या प्रसंगानंतर प्रभू श्रीराम, लक्ष्मण व सीतामाईच्या वेशभूषेतील कलावंतांची परिसरात रथातून मिरवणूक काढली जात असे.

पुरुष साकारत होते स्त्री भूमिका

सुरवातीच्या काळात रामलीलेतील स्त्री भूमिका पुरुष कलावंत करत असे. शब्बीर अली, लियाकत अली पठाण, विष्णू गंगतानी, कृष्णा गवांदे, बालमसिंग, हजरीलाल शुक्ला, बिंदरसिंग, सुरिंदरसिंग या पुरुष कलावंतांनी रामलीलेत सादर केलेल्या स्त्री भूमिका अजरामर ठरल्या आहेत. १९६५ मध्ये श्यामा हिंदळेकर यांनी प्रथम शूर्पणखेची भूमिका केली. त्यानंतर स्त्रियांनी रामलीलेत सहभाग घ्यायला सुरवात केली.

रामलीलेचे प्रमुख आकर्षण म्हणजे दसरा. दसऱ्‍याच्या दिवशी रामलीला मैदानावर रावणाच्या ५३ फुटी पुतळ्याचे दहन करण्यात येते. याप्रसंगी प्रभू श्रीरामचंद्रांची वानरसेना व रावणाची राक्षससेना यांच्यात घनघोर युद्धाचे दृश्य सादर करण्यात येते. सोबत मनमोहक आतषबाजीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटते.

दरवर्षी दसऱ्‍याच्या दिवशी हे दृश्य बघण्यासाठी शहर परिसरातून ५० ते ६० हजार लोक येतात. यातील सर्वच कलावंतांच्या अंगात रामलीला इतकी भिनली आहे की, यातील सर्व संवाद व गीते तोंडपाठ तर आहेच, परंतु दरवर्षी नवरात्रीच्या एक महिना अगोदर हे कलावंत अक्षरश: घरदार विसरून तालमीत मग्न असतात.

"रामलीला नाट्यदर्शनमध्ये विविध जाती-धर्मीय आणि हौशी कलावंत एकत्रित काम करतात. रामलीलेच्या माध्यमातून रामायणातील सदविचार जनतेपर्यंत पोचवताना एक प्रकारे राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाते. म्हणून हा महाराष्ट्रातील प्रभू राम-भक्तांचा राष्ट्रीय उत्सव होत आहे."

- संजय रासकर, ज्येष्ठ कलावंत

हेही वाचा: DPDC Meeting | विकासकामांचा 10 दिवसात फेरआढावा : दादा भुसे

टॅग्स :Nashikramayanaramleela