HSC Exam : बारावी इंग्रजीच्‍या पेपरमधील 6 गुणांच्या त्रुटींबाबत शिक्षण मंडळाचा निर्णय; जाणुन घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SSC and HSC Board

HSC Exam : बारावी इंग्रजीच्‍या पेपरमधील 6 गुणांच्या त्रुटींबाबत शिक्षण मंडळाचा निर्णय; जाणुन घ्या

नाशिक : बारावीच्‍या लेखी परीक्षेत पहिल्‍याच इंग्रजी विषयाच्‍या प्रश्‍नपत्रिकेत त्रुटी आढळून आलेल्‍या आहेत. त्‍यामुळे सर्व विद्यार्थ्यांना सहा गुण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. ती मान्य झाली असली तरी सरसकट सगळ्यांनाच हे गुण मिळणार नसून त्यासाठी मंडलाने आज काही निकष निश्‍चित केले आहेत. त्यात बसणाऱ्यांनाच हे गुण मिळणार आहेत.

ज्‍या विद्यार्थ्यांनी संबंधित प्रश्‍नासंदर्भात उत्तरपत्रिकेत काहीतरी लिखाण केले असेल, त्‍यांनाच हे गुण मिळणार असल्‍याचे निवेदन शिक्षण मंडळाने जारी केले आहे. (Board of Educations decision regarding 6 marks error in HSC Exam English paper nashik news)

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

शिक्षण मंडळाच्या या निवेदनात म्‍हटले आहे, की फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्‍या बारावीच्‍या लेखी परीक्षेत इंग्रजी विषयाच्‍या प्रश्‍नपत्रिकेत त्रुटी आढळून आल्‍या होत्‍या.

प्रचलित पद्धतीप्रमाणे इंग्रजी विषयाची संयुक्‍त सभा विषयतज्‍ज्ञ व सर्व विभागीय मंडळाचे प्रमुख नियामक यांच्‍यासमवेत बैठक आयोजित केली होती. इंग्रजी प्रश्‍नपत्रिकेमध्ये त्रुटी, चुका आढळून आल्‍या असल्‍याने इंग्रजी विषयाच्‍या संयुक्‍त सभेच्‍या अहवालानुसार निर्णय घेण्यात आलेला आहे.

या प्रकरणांत मिळतील गुण

* पोएट्री सेक्‍शन२, पोएट्री/सेक्‍शन २, असा उत्तरपत्रिकेमध्ये उल्‍लेख केला असल्‍यास,

* पोएट्री सेक्‍शन-२ मधील अन्‍य कोणतेही प्रश्‍न विद्यार्थ्यांनी सोडविण्याचा प्रयत्‍न केला असल्‍यास.

* त्रुटी असलेल्‍या प्रश्‍नांचे क्रमांक (ए-३, ए-४, ए-५) असे केवळ उत्तरपत्रिकेत नमूद केले असल्‍यास.

अशा तीन पैकी कोणत्याही एका प्रकारचे लेखन उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्यांनी केले असल्‍यास, विद्यार्थ्यांना प्रत्‍येक प्रश्‍नासाठी दोन याप्रमाणे ६ गुण दिले जातील.