कोमल, सर्वदा गायकवाडतर्फे
दहा हजार विद्यार्थ्यांचे प्रबोधन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १८ : अवघ्या दहा महिन्यांत जिल्ह्यातील विविध शाळांत जाऊन ३५ व्याख्यानांच्या माध्यमातून ‘माझं शरीर माझा अधिकार’ या संवेदनशील विषयावर दहा हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये जनजागृती केल्याचे कोमल महाजन व सर्वदा गायकवाड यांनी सांगितले.
रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीनसिटीतर्फे गणपतीनगरातील रोटरी भवनात आयोजित अनुभव कथन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यांच्यासमवेत अध्यक्ष रत्नाकर पाटील, मानद सचिव डॉ. भावना चौधरी यांची उपस्थिती होती. जामनेर येथील असलेल्या या १७वर्षीय युवतींनी ‘इम्पॅक्ट : १७’ या नावाने हे अभियान सुरू केले आहे. मुला-मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात जागृती व्हावी, म्हणून डिसेंबर २०२५पासून या कार्यास सुरुवात केली आहे. पहिली ते चौथी व पाचवी ते दहावी अशा दोन गटांत मुले आणि मुलींसाठी एकत्रितपणे शरीर सुरक्षितता जागरूकता सत्र घेतात. यामधून वैयक्तिक मर्यादा, सुरक्षित व असुरक्षित स्पर्श, संमती व स्वतःचे म्हणणे मांडणे व विश्वासू मोठ्या व्यक्तींची मदत घेणे, याबाबत आम्ही माहिती देतो, असे त्यांनी सांगितले.
कोमल व सर्वदा या दोन्ही विद्यार्थिनींची बारावीची परीक्षा असल्याने या अभियानाला त्यांनी स्वल्पविराम दिला आहे. भविष्यात एका स्वयंसेवी संस्थेची स्थापना करून मोठ्या स्वरूपात हे कार्य करण्याचा मानस त्यांनी शेवटी व्यक्त केला. कार्यक्रमास रोटरी क्लब जळगावचे माजी सचिव व करिअर कौन्सिलर पंकज व्यवहारे, रोटरी ग्रीनसिटीचे ॲड. अभय कुलकर्णी, दिनेश थोरात, अभिजीत पाटील, विकास निकम, इरफान पिंजारी, जगदीश माळी, उल्हास सुतार, लाभांश भावसार, रुपेश पाटील, माधुरी थोरात, कविता पाटील, अश्विनी माळी, ऋतुजा भंडारी व इतर सदस्यांची उपस्थिती होती.