मोहाडीत लोकसंस्कृतीचे दर्शन | Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bohada festival

मोहाडीत बोहाड्यातून लोकसंस्कृतीचे दर्शन

मोहाडी (जि. नाशिक) : शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या पारंपरिक बोहाडा उत्सवाची (Bohada festival) सांगता मंगळवारी (ता. २८) जोशी यांच्या घराण्याकडे असलेल्या नरसिंह-हिरण्यकश्यपू वधाने झाली. ग्रामदैवत श्री मोहाडमल्ल महाराज देवस्थानच्या प्रांगणात २४ जूनपासून उत्सवाला प्रारंभ झाला. पाच दिवस सुरू असलेल्या या उत्सवात विविध सोंगे घेऊन पारंपरिक बोहाड्यातून लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या उत्सवासाठी विविध प्रकारचे पोशाख परिधान करून संबळच्या तालावर विशिष्ट प्रकारचा नाच केल्याने करमणुकीबरोबरच मनोरंजन झाले.

हेही वाचा: घरकुल अपुले : सणवार आणि प्रसादाचा शिरा

बोहाडा पाहण्यासाठी पाचही दिवस गाव व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. त्यात महिला व युवकांची उपस्थिती उल्लेखनीय होती. पारंपरिक संबळ वाद्यावर देव-देवतांची निघालेली सोंगे ज्येष्ठांबरोबर तरुणांनाही आकर्षित करू लागली आहेत. प्रत्येक सोंगाची विधिवत पूजा व आरती करण्यात आली. बोहाडा उत्सवात गणपती, शारदा, इंद्रजित, रावण, वीरभद्र दक्षराजा, खंडेराव, भैरोबा, पंचमुखी महादेव, ध्रुवबाळ, गजासूर, भीम, बकासुर, वेताळ, साती आसरा, घटतकोच, हेडंबा, अभिमन्यू, झोटिंग, भील्लीनी, देवी, म्हसोबा, यम, मासा, नारद, गौळणी, काट्यामारुती, भस्मासुर, आसळका, भगत-भूतळ्या आदी सोंगांचा समावेश होता.

सतीश काळे हे नाचविलेल्या प्रत्येक सोंगाची विचारणा ‘हे कोण आले’ अशी करीत, तर त्यावर अरविंद पवार व शंकर ठाकूर प्रत्येक सोंगाची पुराणातील कथास्वरूपात मनोरंजक शैलीत माहिती देत होते. उत्सवात पूर्वीपासून नाभिक समाजाचे दिवंगत श्रीकृष्ण नेवकर यांच्या घराण्याकडे असलेल्या वीरभद्राचा विद्युत रोषणाईचा फिरता टोप त्यांचे नातू आकाश व ओम नेवकर यांनी संबळ वाद्याच्या तालावर नाचविला. पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अरुण आव्हाड, हवालदार जाधव यांनी बंदोबस्त चोख ठेवला. बोहाडा उत्सव यशस्वितेसाठी पंच गणपत जाधव, दत्तात्रय मौले, शांताराम निकम, लक्ष्मण पाटील, लक्ष्मण कळमकर, सुदर्शन जाधव, विजय देशमुख, बाबा निकम, महेश देशमुख आदींसह ग्रामस्थ प्रयत्नशील होते.

हेही वाचा: विषमता वटसावित्रीच्या पूजेतली!

Web Title: Bohada Festival In Mohadi Village Dindori Taluka Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top