घरकुल अपुले : सणवार आणि प्रसादाचा शिरा

श्रावण जवळ आला, की उत्साहाला उधाण येतं. सणवार.. निसर्गानं मुक्त उधळण केलेली हिरवीगार धरती.. घराची स्वच्छता... आणि सणवारासाठीची तयारी.
Prasad Shira
Prasad ShiraSakal
Summary

श्रावण जवळ आला, की उत्साहाला उधाण येतं. सणवार.. निसर्गानं मुक्त उधळण केलेली हिरवीगार धरती.. घराची स्वच्छता... आणि सणवारासाठीची तयारी.

- मीनल ठिपसे

श्रावण जवळ आला, की उत्साहाला उधाण येतं. सणवार.. निसर्गानं मुक्त उधळण केलेली हिरवीगार धरती.. घराची स्वच्छता... आणि सणवारासाठीची तयारी. आपल्या संस्कृतीमध्ये सणवार, व्रतवैकल्यं यांना विशेष महत्त्व आहे. श्रावणापासून सणवार सुरू होतात आणि म्हणून या महिन्याला ‘सणवारांचा राजा’ असं संबोधलं जातं. सोमवार आणि शुक्रवार यांना खास स्थान आहे. काही जणांकडे श्रावणातील पहिल्या दिवशी, तर काही जणांकडे पहिल्या शुक्रवारी जिवतीचं चित्र भिंतीवर लावून स्त्रिया त्याची पूजा करतात. जिवतीपूजन लहान मुलांचं रक्षण करण्यासाठी केलं जातं. १६ काड्या दुर्वा, आघाडा आणि कापसाच्या वस्त्रमाला यांनी जिवतीची पूजा करतात.

माझ्या आठवणीत आईची एक मैत्रीण दरवर्षी आमच्याकडे शुक्रवार सवाष्ण म्हणून जेवायला यायची. आजही येतेच. साग्रसंगीत स्वयंपाक आणि सर्व रंगाची फुलं वाहून सजवलेलं माझ्या माहेरचं देवघर आणि संध्याकाळी आईकडून ओवाळून घेणं लख्ख लक्षात आहे. त्या ओवाळताना आमच्या दोघींची दृष्टादृष्ट व्हायची आणि ज्योतींच्या आरपार एकमेकींचे प्रसन्न चेहरे पाहताना नकळत डोळ्यात पाणी यायचं. आपोआप त्या माउलीचे पदस्पर्श करायचे मी आणि आई भरभरून आशीर्वाद द्यायची.

सासरी आल्यावरही शुक्रवार अगदी उत्साहात करते. खूप प्रसन्न वाटतं. सकाळी लवकर उठून सगळी तयारी, देवघर स्वच्छ करून जिवतीची पूजा, आरती, रांगोळी, गोडधोडाचं जेवण बनवणं आणि नटूनथटून आलेल्या लेकुरवाळ्या सख्यांना तृप्त होईतो जेवण वाढायचं आणि संध्याकाळी माझ्या लेकरांना ओवाळायचं.

हल्ली बरेचदा मुलींना माहेरी जाता येतं. सतत संपर्क असतो; पण पूर्वी असं नव्हतं. श्रावणात मात्र या माहेरवाशिणींना हक्कानं माहेरी जाता यायचं. मग तिच्यासाठी खास बेत बनायचे. जमेल तसं घरचे तिच्या आवडीचं बनवायचे. नागपंचमीला हातावर मेंदी काढून सख्यांसोबत उंच झोके घेत, विविध सणवार आनंदानं उपभोगून तृप्त मनानी सासरी यायची. एकूण काय... लेकरांना उदंड निरोगी आणि आनंदी आयुष्य मिळो हे एकच मागणं असतं आपलं.. पण आपल्या संस्कृतीचं जतन आपणच कारायला हवं.

दरवर्षी न चुकता आम्ही श्रावणात लघुरुद्र करतो. रुद्र हे शंकराचं एक स्तोत्र. ते ११ वेळा म्हटलं, की एकादशिनी होते. अशी ११ म्हणजे लघुरुद्र! पूजा, स्वयंपाक वगैरे तर झालंच; पण घरभर निनादणारे ते मंत्रोच्चार मन भारावून टाकतात. याची तयारीही अतिशय नेटकी लागते. एकूणच सगळं खूप प्रसन्न... मांडलेली पूजा... फळं... नैवेद्य... घरभर दरवळणारा उदबत्तीचा सुवास...धूप आरती... मंद वात तेवणारी समई... श्रावणात दररोज लावला जाणारा तुपाचा दिवा...सगळंच खूप विलक्षण!

शेवटी आरती करताना एक गोष्ट प्रामुख्यानं जाणवली... मुलाच्या तर बऱ्याचशा आरत्या पाठ आहेतच; पण माझी लेकही छान म्हणत होती. मला स्वतःला इंग्रजी उत्तम बोलता येतं, लिहिता येतं; पण तरीही माझ्या मुलांना हे संस्काराचं बाळकडू द्यायला मी विसरले नाहीये. आरत्या पाठ केल्यानं शब्दोच्चार किती स्पष्ट येतात पाहा एकदा. नवीन गोष्टी आल्याच पाहिजेत; पण आपली संस्कृती, आपले सणवार आणि त्याचं महत्त्व मुलांना पटवून द्यायला विसरू नका.

मी आणि माझे कुटुंबीय सगळेच सणवार मनापासून साजरे करतो. थीमनुसार कपडे, रांगोळी, पूजाअर्चा, नैवेद्य, स्वयंपाक अगदी सगळं! श्रावण म्हटलं, की सणवार आठवतात तसं प्रसादाचा शिरा आठवतो... सव्वा वाटी प्रमाणाचा. अर्थात आमच्याकडे कधीही आवडतो हा शिरा. फार राजेशाही आणि देखणं रूपडं असलेला हा खास शिरा.

साजूक तुपात मंद आचेवर बारीक रवा भाजून घ्यायचा. छान भाजला गेला, की त्यात केळ्याचे तुकडे घालायचे. छान एकजीव झाले, की दुपटीत दूध आणि अर्धा वाटी पाणी एकत्र करून तापवून घ्यायचं. केशराच्या बळेच जास्त काड्या घालायच्या... सुरेख रंग येतो... रव्याच्या मिश्रणात घालायचे, मग साखर घालायची. अंमळ चिमूट जास्तच वेलदोडा पावडर घालायची. पुन्हा थोडं साजूक तूप आणि मंद आचेवर झाकण ठेवून छान वाफ काढायची.

बरं, उगाच काचेच्या भांड्यात वगैरे नाही हं ठेवायचा. अगदी ठेवणीतील पितळी किंवा चांदीच्याो भांड्यात काढायचा. मूद पाडून आधी नैवेद्य दाखवायचा आणि मग अहाहा ताव मारायचा! याचा थाटबाट अगदी शाही असतो. चारोळ्या, बदाम काप, पिस्ता, वेलदोडा पावडर, पिस्ता काप, बेदाणे अगदी सगळं सगळं घालून सजवायचं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com