NSK26H31373 : ललित झवर
---------
बहिणीला आणायला निघालेल्या
भावाचा अपघातात मृत्यू
पाळधी-तरसोद ‘बायपास’वर कंटेनरची दुचाकीला धडक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ४ : आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी माहेरी येणाऱ्या बहिणीला घेण्यासाठी जळगावला येत असलेल्या ललित मनोहर झवर (वय ३०, रा. पाळधी, ता. धरणगाव, हल्ली रा. प्रेमनगर, जळगाव) यांच्या दुचाकीला कंटेनरने धडक दिली. या भीषण अपघातात ललित पुलावरून खाली फेकले गेल्याने जागीच ठार झाले. पाळधी-तरसोद बायपासवरील टाकळी फाट्यानजीक रविवारी (ता. ४) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
पिंप्राळा परिसरात राहणारे विमा एजंट ललित झवर यांच्या आजोबांचे सोमवारी (ता. ५) वर्षश्राद्ध असल्याने कुटुंबीय पाळधी येथे मूळ गावी गेले होते. वर्षश्राद्धासाठी ललित यांची बहीण येणार असल्याने तिला घेण्यासाठी ते दुचाकीने जळगाव रेल्वेस्थानकाकडे निघाले होते. पाळधीहून बायपासमार्गे येत असताना टाकळी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला कंटेनरने जोरदार धडक दिली. धडकेने ललित पुलावरून खाली फेकले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थ व वाहनधारकांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
चौकट
जिल्हा रुग्णालयात गर्दी
घटनेची माहिती मिळताच झवर यांचे नातेवाईक व मित्र परिवाराने रुग्णालयात धाव घेतली. ललित झवर यांच्या अपघाती मृत्यूमुळे या कुटुंबाचा आधार हरवला आहे. एकुलत्या एक मुलाच्या अकाली जाण्याने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.