Nashik Crime News : बंटी-बबलीची पुन्हा करामत; महिलेच्या डोळ्यादेखत लांबवले दागिने अन् रोख रक्कम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Nashik Crime News : बंटी-बबलीची पुन्हा करामत; महिलेच्या डोळ्यादेखत लांबवले दागिने अन् रोख रक्कम

वावी (जि. नाशिक) : तालुक्यात बंटी-बबलीच्या जोडीने उच्छाद मांडला असून कहांडळवाडीतील जवानांच्या बंद घरात घरफोडी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील शहापूर येथेही या जोडीने करामत दाखवत शुक्रवारी (ता. २०) दुपारी अडीचच्या सुमारास शेतकऱ्याच्या बंद घराचे कडीकोयंडा तोडला.

घरफोडी करत सुमारे पाच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह ५५ हजारांची रोकड लांबविल्याने ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे. (Bunty Bubli crime again Jewels cash theft in front of woman at vavi Nashik Crime News)

शहापुर गावात शरद सूर्यभान सांगळे यांचे घर असून शुक्रवारी (ता.२०) शरद सांगळे हे कामानिमित्त बाहेर गेले होते, तर त्यांचे आईवडील व कुटुंबीय शेतात कामासाठी गेले होते. तर शरद सांगळे यांच्या घराशेजारीच राहणारी त्यांची चुलती पमाबाई सांगळे ही घरापासून जवळच असलेल्या शेजाऱ्यांकडे गेली होती.

दुपारी अडीचच्या सुमारास गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली सावळ्या रंगाची एक महिला व गुलाबी रंगाचा शर्ट परिधान केलेला व पंढरपुरी शालीने चेहरा झाकलेला पुरुष दोघेही प्लॅटीना दुचाकीवरून आले.

शरद सांगळे यांच्या घराला कुलूप असल्याचे पाहून संशयितांनी सांगळे यांच्या घरासमोर दुचाकी थांबविली. दुचाकीवरुन उतरून महिलेने फोनवर बोलण्याचे नाटक करत पाळत ठेवण्यास सुरवात केली. तर पुरुषाने सांगळे यांच्या घराचे कुलूप व कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत दरवाजाला आतून कडी लावून घेतली.

हेही वाचा: Nashik Crime News : नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच

घरातील कपाटात ठेवलेले ५ तोळ्याचे सोन्याचे दागिने व ५५ हजारांची रोकड काढली. दरम्यान जवळच शेजारी गेलेल्या पमाबाई सांगळे यांना आपल्या घराजवळ कोणीतरी महिला फोनवर बोलताना दिसल्याने त्यांनी जवळ येत सदर महिलेस विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता चालाख बबलीने फोनवरच जोर-जोरात मावशी-मावशी असे बोलून आत गेलेल्या साथीदाराला इशारा केला.

इशारा मिळताच चोरी केलेल्या दागिने व रोख रकमेसह तो बाहेर आला व काही कळण्याच्या आत दोघेही दुचाकीवर बसून पसार झाले. पमाबाई सांगळेंना त्यांच्या वर्तनाचा संशय आल्याने त्यांनी लागलीच आपला पुतण्या शरदला यासंदर्भात माहिती दिली.

शरद सांगळे यांनी लागलीच घराकडे धाव घेतली असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सांगळे यांनी तत्काळ मुसळगाव एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

हेही वाचा: Pune Crime News : पुण्यात तरुणांचा कोयते फिरवत हैदोस सुरूच; मार्केट यार्ड परिसरात अल्पवयीन...