Nashik Crime: अट्टल घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार गजाआड; 11 घरफोड्यांची उकल | burglars arrested 11 Burglary case solved Nashik Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Nashik Crime: अट्टल घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार गजाआड; 11 घरफोड्यांची उकल

Nashik Crime : किराणा दुकाने आणि वाईन शॉप टार्गेट करून शिताफीने फोडून रोकड, दारुच्या बाटल्या चोरणाऱ्या अट्टल घरफोड्याच्या शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने अखेर मुसक्या आवळल्या.

विशेषत: गेल्या एप्रिल २०२२ मध्येच तो शिक्षा भोगून बाहेर आला होता. त्यानंतर त्याने शहर-जिल्ह्यात अकरा घरफोड्या केल्या असून त्याच्याकडून एक लाख १६ हजारांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. नाशिक शहर व जिल्ह्यासह परजिल्हा व परराज्यातही त्याने घरफोड्या केल्या आहेत. (burglars arrested 11 Burglary case solved Nashik Crime)

हसन हमजा कुट्टी (४४, रा. नवनाथ नगर, पेठरोड, पंचवटी) असे गजाआड करण्यात आलेल्या अट्ट्ल घरफोड्याचे नाव असनू, त्याच्याविरोधात १४ घरफोड्यांचे गुन्हे दाखल आहेत. कुट्टी घरफोड्या करण्यासाठी किराणा दुकान आणि वाईन शॉपची दुकाने हेरून ते तो मोठ्या शिताफीने फोडायचा.

त्यानंतर या दुकानांमधील रोकड तर वाईन शॉपमधून दारुच्या बाटल्या चोरून नेत होता. मात्र, पोलिसांच्या हाती लागत नव्हता. पंचवटीतील नवनाथनगरमध्येही तो लपून छपून राहत होता. त्यामुळे पोलिसांच्या कोबिंग ऑपरेशनमध्येही तो कधी पोलिसांच्या हाती लागला नाही.

दरम्यान, शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचा पोलीस कर्मचारी विशाल काठे यास कुट्टीची खबर मिळाली असता, त्याने सदरील माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना दिली. त्यानुसार, सहायक निरीक्षख तोडकर यांचयासह पथकाने सापळा रचून मंगळवारी (ता. ६) रात्री कुट्टी यास नवनाथनगरमधून ताब्यात घेतले.

यावेळी त्याने मोपेडवरून पोलिसांच्या हातून निसटण्याचाही प्रयत्न केला. पोलीस चौकशीत त्याने नाशिकमध्ये सहा तर ग्रामीणमध्ये पाच दुकानांचे शटर वाकवून घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक आयुक्त हेमंत तोडकर, उपनिरीक्षक विष्णू उगले, चेतन श्रीवंत, रवींद्र बागुल, प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, नाझीम खान पठाण, विशाल काठे, विशाल देवरे, मुक्तार शेख, अप्पा पानवळ, राजेश राठोड, शरद सोनवणे यांनी बजावली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अशी होती मोडस्‌

संशयित कुट्टी किराणा, कापड, वाईन शॉपची दुकाने हेरून फोडायचा. या दुकानांतील गल्ल्यातील रोकड चोरायचा. तसेच, मद्याच्या दुकानांमधून मद्याच्या बाटल्या चोरून त्या विकायचा.

यामुळे अटक केल्यानंतर त्याच्याकडून १ लाख १६ हजार ९० रुपयांचाच मुददेमाल जप्त झाला आहे. चोरीचे पैसे खर्च केले तर बहुतांशी मद्य स्वत: पिवून काही बाटल्या विकल्या आहेत.

आडगाव, पंचवटीतील दोन, म्हसरुळ, मुंबई नाका भद्रकाली पोलीस ठाण्यासह नाशिक तालुका व वाडिवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन अशा ११ गुनह्यांची उकल झाली आहे. तर, त्याने सोलापूर आणि मध्यप्रदेशातील शिंदवाडा येथेही ७-८ घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.

घरफोडीत शिक्षाही भोगली

पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये २०१८ मधील घरफोडीच्या गुन्ह्यात त्याला शिक्षाही ठोठावली होती. गेल्या एप्रिल २०२२ मध्ये कुट्टी शिक्षा भोगून बाहेर आला. त्यानंतर त्याने पुन्हा घरफोह्याचे सत्र सुरू केले. परंतु यावेळी त्याने किराणा, कापड आणि दारुचीच दुकाने लक्ष्य केले होते.