Latest Marathi News | प्रवाशांनी गजबजली बसस्‍थानके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Bus Stand Crowd

Nashik : प्रवाशांनी गजबजली बसस्‍थानके

नाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून शहरातील बसस्‍थानकांवर प्रवाशांची लक्षणीय गर्दी होत आहे. त्‍यातच रविवारी (ता. ३०) शहरातील नवीन सीबीएस, जुने सीबीएससह महामार्ग बसस्‍थानक प्रवाशांनी गजबजलेले बघायला मिळाले. दिवाळीनंतर अनेकांनी परतीचा प्रवास सुरू केल्‍याने प्रवाशांची गर्दी होत आहे. प्रामुख्याने पुण्यासह खानदेशात प्रवासाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दिवाळी सणाच्‍या शाळा, महाविद्यालयांना सुट्या होत्‍या. तसेच शासकीय, खासगी कार्यालयांनाही सुट्या असल्‍याने अनेकांनी आपल्‍या स्‍वगृही दिवाळीचा सण साजरा केला, तर दिवाळीच्‍या सुट्यांमध्ये पर्यटनासाठीही अनेक प्रवासी घराबाहेर पडले. यामुळे बसस्‍थानकांवर प्रवाशांची वर्दळ बघायला मिळत होती.(Bus stations Crowded passengers After Diwali Nashik News)

हेही वाचा: नाशिकमध्ये हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद; पारा आणखी खालावण्याची शक्यता

दिवाळीच्‍या दिवसात प्रवासी संख्येने उच्चांक गाठला होता. येत्‍या आठवड्यापासून महाविद्यालये सुरू होत असून, कार्यालयीन कामकाजही सुरळीत होणार आहे. माहेरवाशींनीनाही आता पुन्‍हा सासरचे वेध लागले आहेत. त्‍यामुळे विद्यार्थी, चाकरमान्‍यांसह महिला वर्गाकडून परतीच्‍या प्रवासाला सुरवात झाली आहे. रविवारी शहरातील प्रमुख बसस्‍थानकांवर प्रवाशांची गर्दी बघायला मिळाली.

प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळातर्फे जादा बसगाड्यांची व्‍यवस्‍था केली आहे. या बसगाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. नवीन सीबीएस येथून पुणे, धुळे, जळगाव, औरंगाबादसाठी विनावाहक व वाहकासह बसगाड्या सोडण्यात आल्‍या, तर जुने सीबीएस येथून जिल्‍हांतर्गत सटाणा, कळवण, देवळ्यासह धुळे, नंदुरबार, साक्रीसाठी बसगाड्या सोडण्यात येत होत्‍या. विविध मार्गांवरील बसगाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

उद्यापासून नियमित भाडे

दिवाळीच्‍या हंगामात एसटी महामंडळाकडून परिवर्तनशील (हंगामी) भाडेवाढ जाहीर केली होती. २१ ऑक्‍टोबरपासून ही हंगामी भाडेवाढ लागू असल्‍याने प्रवाशांना १५ ते ५० रुपयांपर्यंतचे जादा भाडे मोजावे लागत आहे. मात्र, सुरक्षित प्रवासाच्‍या अनुषंगाने प्रवाशांचा एसटी महामंडळाच्‍या बसगाड्यांनाच प्रतिसाद मिळत आहे. दरम्‍यान, ही हंगामी भाडेवाड उद्या (ता. ३१)पर्यंत लागू असल्‍याने, मंगळवार (ता. १)पासून नियमित भाडे अदा करत प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.

हेही वाचा: Nashik Crime News : चोरट्यांनीही साधली दिवाळी ‘संधी’; पोलिसांची नाकाबंदी ‘फेल’

टॅग्स :NashikBus StandPassengers