esakal | नाशिकमध्ये हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद; पारा आणखी खालावण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

nifad cold.jpg

जिल्ह्यातील पारा घसरण्यास सुरवात झाली असून, नागरिकांना पुन्‍हा एकदा हुडहुडी भरायला लागली आहे. सोमवारी (ता.२१) नाशिकमध्ये यंदाच्‍या हंगामातील नीचांकी ९.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. येत्‍या काही दिवसांत पारा आणखी खालावण्याची शक्यता आहे. 

नाशिकमध्ये हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद; पारा आणखी खालावण्याची शक्यता

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : जिल्ह्यातील पारा घसरण्यास सुरवात झाली असून, नागरिकांना पुन्‍हा एकदा हुडहुडी भरायला लागली आहे. सोमवारी (ता.२१) नाशिकमध्ये यंदाच्‍या हंगामातील नीचांकी ९.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. येत्‍या काही दिवसांत पारा आणखी खालावण्याची शक्यता आहे. 

नाशिकमध्ये हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद 
यंदा गेल्‍या १२ नोव्‍हेंबरला किमान तापमान १०.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. त्‍यानंतर दिवाळीच्‍या सुमारास पुन्‍हा तापमानात वाढ होत सरासरी किमान तापमान २० अंश सेल्सिअस, तर कमाल तापमानदेखील ३० अंश सेल्सिअसहून अधिक नोंदविले जात होते. मात्र, काही दिवसांपासून पुन्‍हा एकदा वातावरणातील गारठा वाढला आहे. त्‍यामुळे आता शेकोट्या पेटू लागल्‍या आहेत. सोमवारी नाशिकचे किमान तापमान ९.१ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान २७.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. 

हेही वाचा >> मित्राच्या बहिणीच्या लग्नाचा तो सोहळा ठरला अखेरचा; जीवलग मित्राची कायमची ताटातूट ​
 
गोंदिया, परभणी, नागपूरनंतर नाशिक 

संपूर्ण राज्‍यातच थंडीचा जोर वाढला असून, सोमवारी राज्‍यात गोंदियात सर्वांत कमी किमान तापमान सात अंश सेल्सियस नोंदविले गेले. त्‍यापाठोपाठ परभणीचे ७.४ अंश आणि नागपूरचे किमान तापमान ८.४ अंश सेल्सिअस होते. राज्‍यात किमान तापमान कमी असलेल्‍या ठिकाणांच्या यादीत नाशिक तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर पुणे (९.२ अंश सेल्सिअस), औरंगाबाद (९.५ अंश सेल्सिअस), अकोला (९.६ अंश सेल्सिअस) अशी गारठल्‍या ठिकाणांची यादी आहे. तर मुंबईचे (कुलाबा) किमान तापमान २१.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. 

हेही वाचा >> चार वर्षाच्या चिमुरड्या 'राई'ने जिंकलं सर्वांचं मन! तीन तास नॉनस्टॉप कळसुबाई सर ​

द्राक्षपंढरी काकडली 
निफाड : कुंदेवाडी (ता. निफाड) येथील कृषी संशोधन केंद्रावर सोमवारी तापमान ८.२ अंश, तर शिवडीला आठ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशसह उत्तरेकडील देशांत बर्फवृष्टी होत असल्याने किमान तापमान उणे झाले आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडीचे जोरदार आगमन झाले आहे. दरम्यान, हरभरा व गहू पिकाला या थंडीचा फायदा होणार आहे. तर, द्राक्ष हंगाम ऐन भरात येणार आहे. अशा परिस्थितीत द्राक्षमण्यांना तडे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी द्राक्षबागांमध्ये उत्पादकांनी द्राक्षघडाला पेपर लावले आहेत. द्राक्षांच्या मुळ्या चोकप होण्यासारखे प्रकार घडणार असल्याने थंडीचा जोर असाच राहिल्यास द्राक्ष उत्पादक आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे. 

शेतकऱ्याचे नियोजन बिघडले

थंडी पुन्हा परतली आहे. त्यामुळे भरात येणारा द्राक्ष हंगाम तसेच, कांदा, भाजीपाला पिकांना याचा फाटका बसणार आहे. थंडीमुळे शेतीच्या कामांवरही परिणाम झाल्याने शेतकऱ्याचे नियोजन बिघडले आहे. बदलत्या वातावरणाशी दोन हात करणे आता आमच्या नशिबी आहे. -छोटू (काका) पानगव्हाणे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, उगाव