नाशिक- समाजात सामान्यांसारखे जगत असतानाच आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या, स्त्री असूनही आपल्या कार्यातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्यास्वयंसिद्धांचा सत्कार शुक्रवारी (ता. ७) ‘सकाळ’तर्फे करण्यात आला. औचित्य होते, महिला दिनाचे व ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीच्या ३६ व्या वर्धापन दिनाचे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर आणि नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी महिलांनी स्वत्वातून स्वयंसिद्धा व्हावे आणि त्यासाठीच्या प्रयत्नांना गती द्यावी, अशी सूचना केली. ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.