esakal | Nashik : मिसिंग रस्ते रिंग रोडला जोडण्यासाठी केंद्राचा निधी
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik : मिसिंग रस्ते रिंग रोडला जोडण्यासाठी केंद्राचा निधी

Nashik : मिसिंग रस्ते रिंग रोडला जोडण्यासाठी केंद्राचा निधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे निर्माण झाले असले तरी मिसिंग लिंकचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. मिसिंग लिंकमुळे रिंग रोडपर्यंत वाहनांना पोचता येत नसल्याने शहर वाहतुकीवर मोठा परिणाम होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर रिंग रोडला जोडणारे रस्ते तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी देण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी भाजप शिष्टमंडळाला दिले.

शहरात सध्या दोन हजार ७०० किलोमीटर रस्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे. २०१४ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यात ९० किलोमीटरचे रस्ते तयार झाल्याने शहराच्या कुठल्याही भागात अवघ्या अर्ध्या तासात पोचणे शक्य झाले आहे. रिंग रोडमुळे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक ठप्प होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. अवजड वाहनेदेखील रिंग रोडने शहराच्या बाहेरून काढणे शक्य झाले आहे; परंतु अद्यापही मोठ्या प्रमाणात मिसिंग लिंक आहे. नवीन बाजार समितीसमोरून मखमलाबादकडे जाताना मिसिंग लिंक आहे. हाच रस्ता पुढे एकसारखा झाल्यास ड्रीम कॅसल येथे वाहनांना जाण्याची आवश्‍यकता नाही, ही बाब भाजप माजी गटनेते जगदीश पाटील यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना पटवून देताना शहरातील वाढत्या वाहतुकीचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार असल्याची माहिती दिली.

त्या अनुषंगाने मिसिंग लिंक शोधून भूसंपादन केल्यास रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून निधी देण्याची तयारी श्री. गडकरी यांनी दाखविल्याने सत्ताधारी भाजपच्या पदरात आणखी एक यश पडले आहे. यापूर्वी नमामि गोदा प्रकल्प, क. का. वाघ ते जत्रा हॉटेलपर्यंतचा उड्डाणपूल, नाशिक रोड ते द्वारकादरम्यानच्या उड्डाणपुलाचा भारतमाला योजनेत समावेश, मुंबई-आग्रा महामार्गावर टनेल व उड्डाणपुलांची निर्मिती, सुरत-चेन्नई ग्रीन फील्डमध्ये नाशिकचा समावेश केल्याने गडकरी खऱ्या अर्थाने नाशिककरांचे रोडकरी झाल्याची प्रतिक्रिया होती. आता शहराचे मिसिंग लिंक रिंग रोडला जोडण्यासाठी केंद्राचा निधी देऊ केल्याने गडकरी यांच्या दौऱ्याचे आणखी एक फलित मानले जात आहे.

मिसिंग लिंक शोधा

शहरातील मिसिंग लिंक शोधून तातडीने भूसंपादन झाल्यास त्यासाठी निधी दिला जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना श्री. गडकरी यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला दिल्या. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासोबत नगरसेवक पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे. या वेळी महापौर सतीश कुलकर्णी, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, स्थायी समिती सभापती गणेश गिते, आमदार ॲड. राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, आमदार डॉ. राहुल आहेर, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके आदी उपस्थित होते.

loading image
go to top