
वाऱ्याचा वेगाने तौत्के चक्रीवादळाची चाहूल; नाशिक जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा
नाशिक : प्रादेशिक हवामान विभागाने पुढील चोविस तास समुद्र किनारपट्टीवरील जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविल्यानंतर रविवारी (ता.१६) दिवसभर शहरातील वाऱ्याचा वेग वाढला होता. पहाटे तुरळक तर दुपारी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. दिवसभर कमी- अधिक वेगाचे वारे वाहत होते. उद्या (ता. १७) शहर व जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Chance of Heavy rain with strong winds in the district due to tauktae cyclone)
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नाशिक जिल्हा व गुजरात राज्याच्या तटवर्ती भागात याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेणे आवश्यक आहे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे. रविवारी (ता.१६) व सोमवारी (ता.१७) वादळाच्या प्रभावाने महाराष्ट्र व गोवा किनारपट्टीवर ५० ते ७० कि.मी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
आपत्तीकालीन क्रमांक
आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष : ०२५३-२३१७१५१, महापालिका - ०२५३-२२२२४१३ किंवा टोल फ्री १०७७ ला संपर्क करावा. असे आवाहान जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आधिकारी प्रशांत वाघमारे यांनी केले आहे.
यंत्रणेचे आवाहन
- मुसळधार पावसात व सोसाट्याच्या वा-यात घराबाहेर पडणे टाळा.
- घराबाहेर असाल तर पाऊस-वारा थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या
- अतिमुसळधार व अतिवृष्टी वादळी वारा असल्यास प्रवास करू नका.
- विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये
- इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर, इमारतीत आसरा घ्या
(Chance of Heavy rain with strong winds in the district due to tauktae cyclone)