Latest Marathi News | देवींचे विसर्जन, रावण दहनामुळे वाहतूक मार्गात हे आहेत बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic Police

Traffic Changes : देवींचे विसर्जन, रावण दहनामुळे वाहतूक मार्गात हे आहेत बदल

नाशिक : दसऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर रामकुंडावर देवींची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते. तसेच, रामकुंडावर श्रीराम-लक्ष्मण सेनेची मिरवणूक होऊन रावण दहन केले जाते. यापाश्‍र्वभूमीवर येत्या बुधवारी (ता.५) दुपारनंतर रात्री दहा वाजेपर्यंत मालेगाव स्टँड ते गाडगे महाराज पुलापर्यंतच्या वाहतूक मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. (changes in traffic route due to immersion of goddesses ravan dahan dasara Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Kalikadevi Yatrotsav 2022 : मुंबई नाका, महामार्गावर वाहतूक कोंडी

येत्या बुधवारी (ता.५) दसरा आहे. नवरात्रोत्सवाची सांगता होऊन देवींच्या मूर्तीचे विसर्जन गोदाघाटावर केले जाते. त्याचप्रमाणे, दसऱ्यानिमित्त येत्या बुधवारी (ता.५) चर्तुसंप्रदाय आखाडा महंत कृष्णचरणदास महाराज यांच्यातर्फे गोदाघाटावरील रामकुंड येथील पार्किंग जागेवर रावण दहनाच आयोजन केले जाते. तत्पूर्वी, श्रीराम-लक्ष्मण सेनेची मिरवणूक काढण्यात येते. ही मिरवणूक सायंकाळी सहा वाजता चर्तुसंप्रदाय आखाड्यातून निघून, चर्तुसंप्रदाय आखाडा, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, शिवाजी चौक, सितागुंफामार्गे काळाराम मंदिर, सरदार चौक, साईबाबा मंदिरमार्गे रामकुंड पार्किंग मैदाना येते.

या ठिकाणी मिरवणुकीची सांगता होऊन, राम-रावणाचे प्रातिनिधिक युद्ध (रामलीला) होते. त्यानंतर, रात्री आठ वाजता रावण दहन करण्यात येतो. त्याचप्रमाणे, ओझर येथील नवरात्र मंडळाच्या देवी मुर्तींचेही विसर्जन रामकुंडावर केले जाते. या पार्श्‍वभूमीवर या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊन वाहतुकीची समस्या उद्‌भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मालेगाव स्टँड ते गाडगे महाराज पुलापर्यंत वाहतूक एकेरी तर गाडगे महाराज पुलकडून येणारी वाहतूक गणेशवाडी मार्गे निमानी बसस्थानकाकडे मार्गस्थ होईल. यासंदर्भात वाहतूक उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

असे आहेत बदल

मालेगाव स्टँड ते गाडगे महाराज पूलापर्यंत दुपारी तीन ते रात्री दहापर्यंत वाहतूक केवळ एकेरी मार्गाने सुरू राहील. मालेगाव स्टँडकडून रामकुंड, सरदार चौक ते गाडगे महाराज पुलापर्यंत सर्व वाहनांची एकेरी मार्गाने वाहतूक सुरू असेल. गाडगे महाराज पुलाकडून मालेगाव स्टँडच्या दिशेने वाहनांना जाता येणार नाही. वाहने गणेशवाडीमार्गे काट्या मारुती पोलिस चौकी, निमाणी बस स्थानक, पंचवटी कारंजा मार्गे इतरत्र जातील. वाहतूकीचे हे बदल दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत राहतील.

हेही वाचा: Nashik Crime : सिडकोमध्ये टोळक्याकडून तरुणाचा पाठलाग; दहशत माजविण्याचा प्रयत्न