
ॲन्टिजेन रॅपिड टेस्टसाठी चक्क 10 रुपये आकारणी? वैद्यकीय अधिकारीही अनभिज्ञ
सिडको (नाशिक) : सिडकोतील अचानक चौकातील महापालिकेच्या शहरी प्राथमिक आरोग्य (health center) केंद्रात ॲन्टिजेन रॅपिड टेस्टसाठी (antigen rapid test) प्रतिरुग्ण दहा रुपये घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तक्रारदार पुढे आले असून वैद्यकीय अधिकारी (medical officer) मात्र या गंभीर प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.
सिडको मनपा रुग्णालयातील प्रकार
काही दिवसांपासून नाशिक शहरामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकएक प्रकरण उजेडात येत आहे. रुग्णांच्या जिवाशी खेळ मांडल्याचा प्रकार यानिमित्ताने दिसून येत आहे. सुरवातीच्या काळात खासगी डॉक्टर रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिले वसूल करत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. त्यानंतर ऑक्सिजन तुटवडा, टॉसिलिझुमॅब आणि रेमडेसिव्हिरचा काळाबाजार उजेडात आला. आता सिडकोतील महापालिकेच्याच एका प्राथमिक आरोग्य केंद्रात चक्क अॅन्टिजेन रॅपिड टेस्टसाठी चक्क दहा रुपये घेतले जात असल्याचा प्रकार उजेडात आला आहे.
हेही वाचा: कडक लॉकडाऊनमध्ये चिकनची दुकाने बंद; ब्रॉयलर कोंबड्यांच्या भावात घसरण
काही दिवसांपूर्वी घरातले एकूण ११ जण ॲन्टिजेन रॅपिड टेस्ट करण्यासाठी सिडकोच्या केंद्रात गेलो. आमच्याकडून ११० रुपये घेण्यात आले. कुठल्याही प्रकारचा केसपेपर दिला नाही. केवळ एका कोऱ्या कागदावर रिपोर्ट लिहून देण्यात येत होता. तणावात असल्याने त्यांना कुठल्याही प्रकारची विचारणा केली नाही. त्यावर कारवाई झाली पाहिजे. - नितीन चव्हाण, तक्रारदार
मनपा सदर आरोग्य केंद्रावर आमच्यासमोर कुठल्याही प्रकारचा केसपेपर न देता रुग्णांकडून प्रति दहा रुपये घेत असल्याचा प्रकार बघायला मिळाला. त्यासंदर्भात विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. - सागर चौधरी, अध्यक्ष, शुभोदय फाउंडेशन, सिडको
हेही वाचा: Nashik Lockdown : टवाळखोरांना पोलिसांकडून दंडूक्याचा प्रसाद! पाहा VIDEO
नुकतीच कामावर रुजू झाली आहे. त्यामुळे या प्रकरणासंदर्भात काहीही माहिती नाही, चौकशी करून कळविते. - छाया साळुंखे, वैद्यकीय अधिकारी, सिडको
काही दिवसांकरिता माझ्याकडे चार्ज होता, आता सोडला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना विचारून घ्या, याची कल्पना नाही.- नवीन बाजी, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, सिडको
Web Title: Charge Ten Rupees For Antigen Rapid Test Nashik Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..