Chhagan Bhujbal | नाशिकला निओ मेट्रो नव्हे मेट्रोची गरज : छगन भुजबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal News

Chhagan Bhujbal | नाशिकला निओ मेट्रो नव्हे मेट्रोची गरज : छगन भुजबळ

नाशिक : नाशिकचा विस्तार पाहता, निओ मेट्रो नव्हे, तर मेट्रोची गरज असल्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (ता. २४) विधानसभेत नियम २९३ नुसार नाशिकच्या प्रश्‍नांवर चर्चा करताना अधोरेखित केले.

तसेच, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी एकही रुपया न देणे हे दुर्दैवी असल्याचे सांगत त्यांनी किकवी प्रकल्प राबवण्यात यावा, नाशिकमधील बेकायदा बांधकामे रोखावी आणि नाशिकच्या प्रदुषणासोबत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शाश्‍वत उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. (Chhagan Bhujbal statement Nashik needs Metro not Neo Metro news)

नाशिकवर नेहमी अन्याय होत असून, हा अन्याय सरकारने दूर करावा. त्याचप्रमाणे नाशिकच्या उद्योग, पर्यावरण, पाणीपुरवठा, शहर विकास, वाहतूक यासह अनेक प्रश्नांवर श्री. भुजबळ यांनी सरकारचे लक्ष वेधले. श्री. भुजबळ म्हणाले, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी १० हजार कोटींचा आणखी एक रिंग रोड नाशिककरांसाठी देऊ, अशी घोषणा केली होती.

मात्र सध्या जो रिंग रोड आहे, त्याची दुरुस्ती केल्यास मोठा फायदा नाशिककरांना होईल. सरकारचे पैसे वाचतील. विश्वस्तरीय सिंहस्थ कुंभमेळा सोहळ्याची तयारी मागील अनुभवानुसार किमान तीन ते चार वर्षे अगोदरपासून होणे अपेक्षित आहे.

मात्र अद्याप तशी तयारी सुरू झाली नाही. २०२६-२७ ला कुंभमेळा होणार आहे, असे सांगून श्री. भुजबळ यांनी बेकायदा बांधकामांचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, की त्र्यंबकेश्वरमध्ये ‘प्लॉटींग'चा धंदा सध्या जोरात आहे. साधुग्रामसाठी जागा उरली नाही.

नाशिकमधील साधुग्रामच्या जागेसाठी ३७५ एकर जागा भूसंपादन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महापालिकेने प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे. शिवाय नाशिक महापालिका हद्दीत २५० एकर जागेवर साधुग्राम आरक्षण आहे. २००३-०४ पासून महापालिकेने या जागा आरक्षित करून ठेवल्या आहेत.

इथले शेतकऱ्यांना त्यात काहीही करता येत नाही. २०१४-१५ च्या कुंभमेळाव्यावेळी तात्पुरत्या भाडेतत्वावर त्या जागा भाड्याने घेऊन साधुग्राम करून वेळ भागवली. तेव्हा शेतकरी न्यायालयात गेले. ८ महिने विलंब झाला. शेवटी तडजोडीने शेतकऱ्यांनी जागा दिली. साधुग्राम झाल्याने तेथे रस्ते, सिमेंट, दगड, वाळू, मुरूम टाकल्याने त्या जमिनी नापिक झाल्या.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

तेथे शेती करणे शक्य नाही. आता त्या जागा कायमस्वरूपी ताब्यात घ्याव्या लागतील. परंतु त्यांना इतके पैसे कोण देणार, तसेच साधूग्रामच्या अनेक जागेवर मंगल कार्यालय-लॉन्स सुरु आहे.

त्यांना जर अधिकृत परवानगी दिली आणि प्रत्येकवेळी कुंभमेळ्यासाठी हे लॉन्स आणि मंगल कार्यालय अधिग्रहीत करून घ्यावे. इतरवेळी ते लोक तेथे व्यवसाय करतील. म्हणजे सरकारचे मोठ्या प्रमाणात पैसे वाचतील.

भुजबळ म्हणाले...

० नाशिकमधील धोकादायक वाडे पुनर्विकास क्लस्टर योजना कागदावर आहे

० नाशिक महापालिकेच्या सर्वेक्षणात ५९ हजार मिळकती बेकायदेशीर आढळल्या

० दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर काम सुरू करावे. नाशिकचा समावेश करावा

० शिलापूर येथील शंभर एकरावरील इलेक्ट्रीक टेस्टिंग लॅब सुरु करण्यात यावी

० उद्योगांना चांगल्या सुविधा देत आयटीसारखे प्रकल्प उभारावेत

० नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती द्यावी

० जिल्हा बँकेच्या कारभारात व्हावी सुधारणा

माथाडी कामगारांच्या मागण्यांबाबत प्रयत्न सुरू : डॉ. खाडे

माथाडी कामगारांनी संप करून विविध मागण्या केल्या आहेत. या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून त्या पूर्ण करण्यासाठी सरकार व कामगार आयुक्तांच्या स्तरावर प्रयत्न सुरु आहे, अशी माहिती कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी लेखी उत्तराद्वारे दिली. श्री. भुजबळ यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला हे उत्तर देण्यात आले.

टॅग्स :NashikChhagan Bhujbal