Nashik News : क्रीडा स्पर्धेच्या वाढीव तरतुदींबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी अंधारात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ZP CEO Ashima Mittal, Nashik News

Nashik News : क्रीडा स्पर्धेच्या वाढीव तरतुदींबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी अंधारात!

नाशिक : जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा स्पर्धांसाठी यंदाच्या आर्थिक संकल्पात १० लाख रुपयांची तरतूद केली असताना, आणखी आठ लाख रुपयांच्या प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मात्र, या प्रस्तावाबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल अंधारात असल्याचे दिसून आले.

या वाढीव खर्चाबाबत विचारणा केली असता, मुख्यकार्यकारी अधिकारी मित्तल यांनी थेट प्रशासनाला विचारणा केली. त्यावर प्रशासनाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. (Chief executive officer in dark about increased provisions of sports competition Nashik News)

गत आठ वर्षांपासून जिल्हा परिषदेत कर्मचारी क्रीडा स्पर्धेचा आयोजन करण्यात आलेले नव्हते. यंदा मात्र, कर्मचाऱ्यांसाठी स्पर्धा आयोजित केल्या असून आशिमा मित्तल यांनी त्यास मंजुरी दिली. तब्बल आठ वर्षानंतर स्पर्धा होत असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्व कार्यालयांमध्ये क्रीडा स्पर्धेचा माहोल आहे.

स्पर्धेसाठी इच्छुक कर्मचारी कार्यालयीन वेळेत सरावासाठी मैदानावर जाऊन सराव करत आहे. अधिकारीही कर्मचाऱ्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. या स्पर्धेत खेळाडूंना क्रीडा साहित्य, जेवण, ट्रॉफी, रोषणाई, म्युझिक व मैदान भाडे आदींसाठी खर्च केला जाणार आहे.

क्रीडा स्पर्धेचा एकूण उत्साह बघून दहा लाख रुपये कमी पडतील, अशी प्रशासनाला जाणीव झाल्याने त्यांनी गत आठवड्यात या स्पर्धेसाठी आणखी आठ लाख रुपयांच्या तरतुदीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला.

म्हणजे क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून १० लाख रुपयांची प्रत्यक्ष तरतूद असताना १८ लाख रुपये खर्चाचा घाट घालण्यात आला आहे. एकाबाजूला जिल्हा परिषदेच्या ३, २०० शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी होणा-या अध्यक्ष करंडक स्पर्धेसाठी सेस निधीमधून केवळ १० लाख रुपयांची तरतूद केली जाते.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

हेही वाचा: Nivruttinath Yatrotsav : भजन, कीर्तन अन् भारुडात रंगले वारकरी! कडाक्याच्या थंडीतही भक्तिभावाने सहभागी

या अध्यक्ष करंडक क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू घडवणे हा हेतू असूनही केवळ दहा लाखांची तरतूद केली जाते. दुसरीकडे प्रशासन स्वतःच्या मनोरंजनासाठी १८ लाख रुपये खर्च करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

या संदर्भात मुख्यकार्यकारी अधिकारी मित्तल यांना विचारणा केली असता, त्यांनी सदर प्रस्तावाबाबत माहीत नसल्याचे सांगितले. मुख्यकार्यकारी अधिकारी यांना न सांगताच, हा प्रस्ताव तयार करण्यात आला का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

"जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात कर्मचारी कल्याण निधी योजनेतून क्रीडा स्पर्धांसाठी सेस निधी वापरता येतो. त्याअंतर्गत जिल्हा परिषद कर्मचारी अधिकारी क्रीडा स्पर्धेसाठी सेसमधून निधीची तरतूद केलेली आहे. यंदा महिला कर्मचारी तसेच इतर नवीन विविध खेळांचा समावेश केल्याने स्पर्धा वाढल्या आहेत. कर्मचारी वर्गासाठी स्वतंत्र किट असणार असून, तीन दिवस कर्मचारी वर्ग स्पर्धासाठी असणार आहे. त्यामुळे वाढीव खर्चाचा प्रस्ताव ठेवला आहे."

- आनंद पिंगळे, उपमुख्य कार्यकारी, अधिकारी जिल्हा परिषद

हेही वाचा: YCMOU News : मुक्त विद्यापीठाच्‍या विद्यार्थ्यांसाठी ‘ई-सुविधा’; प्‍लेस्‍टोअरवर App उपलब्‍ध

टॅग्स :NashiksportsZP