Latest Marathi News | उपचारादरम्यान चिमुकला दगावला; मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Child Death

Nashik : उपचारादरम्यान चिमुकला दगावला; मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका

नाशिक : मुंबई नाका परिसरातील खासगी रुग्णालयात आठ महिन्याच्या चिमुकल्याचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. विच्छेदनानंतर चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेत नातेवाइकांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. यामुळे जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी पोचून नातलगांची समजूत काढून जिल्हा रुग्णालयीन समितीमार्फत पडताळणीचे आश्‍वासन दिल्यानंतर नातलगांनी मृतदेह ताब्यात घेतला. (Child dies during treatment role of parents of non possession of dead body Nashik Latest Marathi News)

ताप असल्याने अर्णव समाधान निकम (वय ८ महिने) यास मुंबई नाका परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अर्णवचा मंगळवारी (ता. ११) मृत्यू झाला. चुंचाळे शिवारातील दत्तनगर परिसरातील निकम कुटुंबीयांनी अर्णवच्या मृत्यूस रुग्णालयासह दोन डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप केला. संबंधित रुग्णालयाच्या डॉक्टरने व्हिडीओ कॉलवरून उपचार केले. मृत्यूचा जाब विचारला असता, रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडून दमदाटी केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

बुधवारी (ता. १२) सकाळीच नातेवाइक जिल्हा रुग्णालयातील शवागृहाबाहेर जमले आणि संशयित डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह घेणार नसल्याची भूमिका घेतली. यामुळे तणाव निर्माण झाल्याने मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहकले, निरीक्षक चंद्रकांत आहिरे यांचे पथक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी पालकांची समजूत काढली. सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींनी मध्यस्थीचा प्रयत्न केला.

हेही वाचा: Crime News: ताहाराबादजवळ जनावरांची सुटका; साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त

नंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांची पालकांनी भेट घेतली. पोलिसांकडून संपूर्ण माहिती प्राप्त झाल्यावर त्वरित समितीतर्फे याप्रकरणी पडताळणी करून अभिप्राय देतो. त्यानंतर पोलिस योग्य कारवाई करतील, असे आश्वासन डॉ. थोरात यांनी दिले. त्यानंतर नातेवाइकांनी जबाबात अधिकचे मुद्दे समाविष्ट करण्याची विनंती पोलिसांना केली. त्यानंतर पालकांनी अर्णवचा मृतदेह ताब्यात घेतला.

"रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज, चिमुकल्यावरील उपचारांची फाईल पोलिसांनी जप्त केली आहे. पालकांचा जबाब व पोलिसांच्या पत्रासह जिल्हा रुग्णालयास पाठविण्यात येईल. त्यांच्या समितीच्या अहवालानंतर पुढील कारवाई होईल."

-सुनील रोहकले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंबई नाका

हेही वाचा: Nashik Crime News : विनयभंग प्रकरणी आरोपीला सश्रम कारावासाची शिक्षा