Nashik | आता तरी होणार का सिडकोचा महापौर? सिडकोवासीयांना शल्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik muncipal corporation

नाशिक | आता तरी होणार का सिडकोचा महापौर? सिडकोवासीयांना शल्य

सिडको (नाशिक) : खान्देश बहूल भाग म्हणून ओळख असणाऱ्या सिडको भागातील एकही नगरसेवक अद्यापपर्यंत नाशिक शहराचा महापौर अथवा उपमहापौर होऊ न शकल्याचे शल्य आजही कामगार वसाहत असलेल्या या सिडकोवासीयांना बोचत आहे. आता तरी होणार का सिडकोचा महापौर, अशा प्रकारचा प्रश्न येथील जनता जनार्दन थेट विविध पक्षप्रमुखांना येणाऱ्या नाशिक महापालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचारताना दिसत आहे.

नाशिक महापालिका स्थापन झाल्यापासून आजपर्यंत सिडको व अंबड परिसरातील एकाही नगरसेवकाला महापौर अथवा उपमहापौरपदाची साधी संधी मिळालेली नाही. हे सिडकोवासीयाकरिता एकप्रकारे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. आतापर्यंत विविध पक्षप्रमुखांनी येथील नगरसेवकांना केवळ महापौर पदाचे आश्वासनाचे गाजरच दाखविल्याचे बघायला मिळते. परंतु, नेमक्या महापौरपदाच्या निवडीवेळी स्थानिक व बाहेरचे अशा प्रकारचा वाद निर्माण करून सिडकोची संधी हिसकावली जात असल्याचे दिसून येते. तर कधी- कधी महापौरपदाच्या आरक्षण मुद्द्यावरूनदेखील ही संधी गमवावी लागली आहे. पूर्वीपासून सिडको हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक सिडकोतून निवडून येतात. लोकसभेलादेखील येथील जनतेने सर्वाधिक मते शिवसेनेच्या पारड्यात टाकली आहेत. तर, विधानसभेला एक वेळा मनसे व दोन वेळा भाजप उमेदवाराच्या पारड्यात मते टाकूनही येथील एकाही नगरसेवकाला महापौर अथवा उपमहापौरपदाची संधी पक्षांनी दिली नाही. ही बाब विशेष म्हणावी लागेल. याबाबत येथील नागरिकांमध्ये मात्र कमालीचे आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे या महापालिका पंचवार्षिक निवडणुकीनंतर तरी सिडकोतून महापौरपदाची संधी मिळेल का , असा प्रश्न सिडकोवासीय उपस्थित करताना दिसत आहे.

हेही वाचा: टीईटी परीक्षा केंद्रांवर प्रवेश नाकारल्याने विद्यार्थी संतप्त

सिडकोची बलस्थाने!

शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे, माजी आमदार अपूर्व हिरे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, काँग्रेसचे लक्ष्मण जायभावे, शिवसेनेचे मामा ठाकरे, तानाजी पडोळ, रत्नमाला राणे, कल्पना चुंभळे, हर्षा बडगुजर तर भाजपच्या अलका आहिरे, प्रतिभा पवार, मुकेश शहाणे, राकेश दोंदे, भाग्यश्री ढोमसे आदी मातब्बर नेते सिडकोतील आहेत.

हेही वाचा: नाशिक : शिर्डी- त्र्यंबक- ओझर- सिन्नरपर्यंत मेट्रो विस्तारीकरण

loading image
go to top