महावितरणविरोधात मनमाडकर रस्त्यावर; वीज खंडीत झाल्याने महामार्ग रोखला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rasta roko

महावितरणविरोधात मनमाडकर रस्त्यावर; वीज खंडीत झाल्याने महामार्ग रोखला

मनमाड (जि. नाशिक) : एकीकडे उन्हाचा पारा ४० अंशावर गेला तर दुसरीकडे दिवसा- रात्री सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. विजेच्या लपंडावीमुळे मध्यरात्री सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिकांनी पुणे- इंदूर महामार्गावर ठिय्या देत रास्तारोको केला. तब्बल दीड तास रस्ता रोखून धरण्यात आल्याने वाहतूक खोळंबली होती. तर वरिष्ठांकडे बोट दाखवत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेली.

नागरिकांसह सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी

शहरात उन्हाचा कहर वाढला असून, सूर्य आग ओकत आहे. सकाळी अकरानंतर नागरिक घराबाहेर पडणे टाळत असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. दुपारनंतर फिरणे टाळले जात असल्याने अनेक जण घरी अथवा व्यापारी दुकानात राहणे पसंत करतात. अशा परिस्थितीत महावितरण कंपनी मनमाडकरांना अघोषित भारनियमनाचा शॉक देत आहे. सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मनमाड शहर पूर्ण ब्लॅकआऊट झाले आणि नागरिकांच्या हालअपेष्टांना पारावार उरला नाही. वातावरणात हवेचा थांगपत्ता नाही तर घरात बसवेना. त्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी पुणे- इंदूर महामार्गावर अचानक रास्तारोको आंदोलन केले. रस्त्यावर नागरिक बसल्यामुळे सर्वपक्षीय नेते, कार्यकर्तेदेखील या आंदोलनात सहभागी झाले. संतप्त आंदोलकांनी महावितरणविरोधात जोरदार घोषणाबाजी दिली.

हेही वाचा: नाशिक : सोयगाव-कॅम्प भागात वीजपंप चोरांचा सुळसुळाट

अचानक झालेल्या रास्तारोकोमुळे पोलिस यंत्रणांची धावपळ उडाली. प्रभारी पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी मध्यस्थी केल्यानंतर पोलिस ठाण्यात रात्रीच बैठकीचे आयोजन करून महावितरणचे उपकार्यकारी अभियंता संदीप शिंदे यांना बोलावण्यात आले. सतत सतत होणाऱ्या वीजपुरवठा खंडितचे कारण विचारले असता शिंदे यांनी मात्र वरिष्ठांकडे बोट दाखवले. आम्ही वरिष्ठांना कळवू, असेही सांगितले.


घरात बसणेही मुश्कील

दिवसा अचानक वीजपुरवठा खंडित होत असल्याने घरात बसणे मुश्कील होत आहे. तर बाहेर उकाड्याने हैराण होते. घरात वीज नसल्यामुळे अंगाची काहिली होते. अशा परिस्थितीत काय करावे, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. तर हीच परिस्थिती रात्रीची असून, रात्री- अपरात्री कधीही वीज पुरवठा खंडित होत असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले जात आहे. रात्रीही उष्णता वाढत असल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे.

हेही वाचा: राज्यातील SC विद्यार्थ्यांना 364 कोटींची शिष्यवृत्ती

आंदोलनात माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, रिपाइंचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र आहिरे, शिवसेनेचे शहरप्रमुख मयुर बोरसे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शहराध्यक्ष जय फुलवाणी, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष नाना शिंदे, सामाजिक कार्यकर्ते रवी निकम, अक्षय देशमुख, रिपाइंचे युवक तालुकाध्यक्ष गुरु निकाळे, सिद्धार्थ निकम, योगेश इमले, प्रितम गायवाड, भगवान भोसले आदी सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले होते.

Web Title: Citizens Of Manmad Staged Rasta Rocco Agitation Against Msedcl Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..