
Citylinc Electric Bus : ‘सिटीलिंक’ घेणार 25 इलेक्ट्रीक बस
नाशिक : महापालिकेतर्फे चालविल्या जाणाऱ्या सिटी लिंक बस सेवेच्या ताब्यामध्ये लवकरच २५ इलेक्ट्रिक बसेसचा समावेश होणार आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, केंद्र सरकारकडून प्राप्त होणारे अनुदान ठेकेदाराला वळते केले जाणार आहे. (Citylinc will buy 25 electric buses nashik news)
सिटी लिंक बस सेवेमध्ये सध्या डिझेल व सीएनजी इंधनावर चालणाऱ्या बसेस चालविल्या जातात. सिटीलींक कंपनीने इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता; परंतु नॅशनल एअर क्लीन मिशन अंतर्गत केंद्र शासनाकडून इलेक्ट्रिक बससाठी अनुदान मिळत असल्याने केंद्र सरकारच्या अनुदानावर इलेक्ट्रिक बस चालविल्या जाणार आहेत.
सिटीलींक कंपनीतर्फे पन्नास बसेसची मागणी नोंदविण्यात आली. परंतु, केंद्र सरकारकडून निधी मिळण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यामुळे बसेसची संख्या ५० टक्क्यांनी घटवत २५ वर आणण्यात आली.
इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी केंद्र सरकारकडून प्रतिबस ५५ लाख रुपये अनुदान मिळणार आहे. मात्र, तूर्त नॅशनल एअर क्लीन मिशन अंतर्गत प्राप्त होणाऱ्या बावीस कोटी रुपयांच्या निधीमधून इलेक्ट्रिक बस खरेदी केल्या जाणार आहेत.
ग्रॉस कॉस्ट कटिंग या तत्त्वावर बसेस घेऊन केंद्र शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान थेट ठेकेदाराला देऊन खर्च भागविला जाणार आहे. मागील आठवड्यात महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने हा निर्णय घेतला.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
सिटीलींक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी चव्हाणके, मुख्य लेखापरीक्षक बी. जी. सोनकांबळे, वित्त व लेखा अधिकारी नरेंद्र महाजन, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, मुख्य महाव्यवस्थापक बाजीराव माळी, चीफ ऑपरेशन मॅनेजर मिलिंद बंड बैठकीला उपस्थित होते.
तपोवन डेपोत चार्जिंग स्टेशन
इलेक्ट्रिक बस घेतल्या तरी बॅटरी चार्जिंगसाठी स्टेशन नाही. त्यामुळे तपोवन डेपोमध्ये बॅटरी चार्जिंगसाठी स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर स्मार्ट सिटी कंपनीतर्फे शहरात वीस ते पंचवीस चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत.