नाशिक : ‘मदतदूत योजने’ची राज्यात दखल; सूरज मांढरे यांना उद्या विशेष पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suraj mandhare

नाशिक : ‘मदतदूत योजने’ची राज्यात दखल; सूरज मांढरे यांना उद्या विशेष पुरस्कार

नाशिक : कोरोनाच्या जागतिक संकटात कोरोनाग्रस्तांना शासकीय मदत देण्याशिवाय नाशिकच्या ४० प्रशासकीय आधिकाऱ्यांनी पुढाकार घेत दोन्ही पालक गमावलेल्या ५८ बालकांना दत्तक घेण्याची शासकीय मदतदूत योजना राबविली. नाशिकच्या या योजनेची राज्यस्तरावर दखल घेतली गेली असून, मंगळवारी (ता. ८) शासकीय मदत दूत योजनेबद्दल जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी अकराला जागतिक महिला दिनानिमित्त मलबार हिल, सह्याद्री अतिथीगृह येथे पुरस्कार वितरण होणार आहे.जिल्हाधिकारी मांढरे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील ४० महसूल आधिकाऱ्यांनी कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या ५८ विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहे. सगळ्यांचे संगोपन हे अधिकारी करणार आहेत. दोन्ही पालक गमावल्यानंतर अनाथ झालेल्या या बालकांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक समस्यांना तोंड द्यावे लागते. पालकांअभावी ही बालकं सध्या जवळच्या नातेवाइकांकडे राहात असून, अनेकांच्या नातेवाइकांना अनाथ मुलांचा अतिरिक्त भार उचलणे कठीण जात आहे. अशा बालकांना दत्तक घेत त्यांच्या पुनर्वसनात योगदान देण्याचा हा अनोखा शासकीय मदत दूत उपक्रम आहे. त्यात प्रत्येक अधिकाऱ्याने त्यांच्या मुलांच्या भेटीगाठी, त्यांना मदत, संपर्क सुरू केला आहे. पाच लाखांची शासकीय मदत, शैक्षणिक खर्चाव्यतिरिक्त अधिकाऱ्यांनी उपक्रम म्हणून त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

आतापर्यंतची कोरोना स्थिती

  • पॉझिटिव्ह चार लाख ७५ हजार ७७५

  • कोरोनाबळी आठ हजार ८९६

  • कोरोनाने वैधव्य दोन हजार ३४५

  • पालक गमावलेली बालकं दोन हजार ५८५

  • दोन्ही पालक गमावलेले ५८

या कामामुळे आम्हाला सर्वांत जास्त समाधान मिळाले, ते जेव्हा आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी दायित्व घेतलेल्या मुलांशी संवाद सुरू केला. एकत्रितपणे आपण आघातांवर विजय मिळवू शकतो. असा त्या कुटुंबात आत्मविश्‍वास निर्माण केला.

-सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

Web Title: Collector Suraj Mandhare Award For Adoption Madatdut Yojana Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top