
Nashik News : पाहणी दौऱ्यात आयुक्तांना वाळणाऱ्या कपड्याचे दर्शन
पंचवटी : प्रदूषण रोखण्यासाठी नदीपात्रात कपडे धुण्यास मनाई आहे, असे असताना पात्रात कपडे धुणे महापालिका प्रशासनाला अजूनही शक्य होत नाही. महापालिका आयुक्तांचा नदी पाहणी दौऱ्याच्या वेळी पुलावर चक्क कपडे धुवून वाळत घातल्याचे दिसत असताना, ना त्याकडे महापालिका अधिकारी, ना कर्मचाऱ्यांनी लक्ष दिले.
आयुक्तांचा पूर्वनियोजित दौऱ्यावेळीही अशी स्थिती दिसत असल्याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह उपसमितीचा गोदावरी तसेच उपनद्यांची पाणी प्रदूषण पाहणी दौरा शुक्रवारी (ता. १६) चोपडा लॉन्स, रामवाडी पूल, लेंडी नाला आणि ढिकले नगर येथील वाघाडी नदी परिसरात झाला. (Commissioner during inspection tour surrounding godavari river Nashik News)
हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
ढिकले नगर परिसरातील वाघाडी नदी येथील पाहणी करत असताना चक्क पुलावर कपडे वाळत घातलेले होते. महापालिका आयुक्तांचा पाहणी दौरा पूर्व नियोजित असून तिथे पालिका कर्मचारी अगोदर पासून आलेले असताना ही त्या पुलाच्या कठड्यावर वाळत टाकलेले कपडे काढण्याची तसदी घेतली नाही.
या पुलाच्या कठड्यावर वाळत घातलेल्या कपड्यांमुळे शहराचे ओंगळवाणे प्रदर्शन तसेच महापालिकेच्या आयुक्तांना सुद्धा गृहीत धरल्यासारखे एकंदरीत चित्र बघायला मिळाले.