टीडीआर घोटाळा चौकशीसाठी समिती | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik-nmc_.jpg

नाशिक : टीडीआर घोटाळा चौकशीसाठी समिती

नाशिक : पंचवटीतील बहुचर्चित टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीला अखेर मुहूर्त लागला असून, अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. पंचवटीतील प्रभाग क्रमांक ४ मधील सर्वे क्रमांक १५९ (पै.) मध्ये आरक्षण क्रमांक ११२ वरील मैदानाची आरक्षित जागा संपादन प्रकरणात झालेल्या टीडीआर घोटाळ्याचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून गाजत आहे. भाजपचे माजी गटनेते जगदीश पाटील यांनी टीडीआर वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप करत या प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आरक्षित भूखंडावर बांधीव शेड व अतिक्रमण असतानाही भूसंपादनाची कारवाई केली गेली.

त्यावरील अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकाम महापालिकेच्या खर्चाने हटवावे लागले. त्याची भरपाई सुद्धा महापालिकेने घेतलेली नाही. कमी क्षेत्राची खरेदी करून टीडीआर मात्र पूर्ण भूखंडावर देण्यात आला. इतके करूनही या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर मालक सदरी महापालिकेचे नाव लागले नाही. यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. मात्र, प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी हा ठराव दडवून ठेवल्याने महासभेचा अवमान झाल्याचा दावा करत पाटील यांनी महासभेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

हेही वाचा: नाशिमधल्या पहिल्‍या BH सिरीज वाहनाची आरटीओत नोंदणी

यासंदर्भात नगररचना विभागाचे सहसंचालक अंकुश सोनकांबळे आणि प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील यांना सभागृहात समाधानकारक माहिती देता आली नाही. चौकशी समितीचे अध्यक्ष संदीप नलावडे हे अपघाताच्या कारणामुळे रजेवर होते. मिळकत विभागाच्या एका अभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये हा ठराव पडून असल्याचे उत्तर मिळाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही महिना उलटूनही समिती गठित केली जात नव्हती. अखेर विलंबाने का होईना प्रशासनाला जाग आली असून, आयुक्त जाधव यांनी चौकशीसाठी समिती नियुक्त केली. अतिरिक्त आयुक्त (शहर) खाडे चौकशी समितीचे अध्यक्ष, तर कार्यकारी अभियंता सी. बी. आहेर या समितीचे सदस्य सचिव तर मुख्य लेखा परिक्षक बोधिकिरण सोनकांबळे सदस्य आहेत. माजी सभागृहनेते सतीश सोनवणे, स्वतः: माजी गटनेते पाटील व गटनेते विलास शिंदे हे या चौकशी समितीवर नामनिर्देशित सदस्य आहेत.

टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीसाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. उशिराने का होईना चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी ही अपेक्षा.

- जगदीश पाटील, नगरसेवक

loading image
go to top