कोरोना विळख्यामुळे रुजतेय 'एक गाव एक गणपती' संकल्पना; वाचा सविस्तर

The concept of Ek Gaon Ek Ganpati will root in Corona outbreak marathi news
The concept of Ek Gaon Ek Ganpati will root in Corona outbreak marathi news

नाशिक/मालेगाव : विघ्नहर्त्या गणरायाचे अवघ्या पाच दिवसात आगमन होणार आहे. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. तालुक्यातील 70 टक्के गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यातच यंदा गणेशोत्सवात शासनाने खूपच निर्बंध घातले आहेत. त्यामुळे अनेक गावांची एक गाव एक गणपती ही संकल्पना रुजविण्याची मानसिकता झाली आहे. अद्याप सार्वजनिक मंडळांकडून परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अल्प प्रतिसाद दिसून येत आहे.

कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उद्योग-व्यवसायाची घडी अजूनही बसत नाही. शहराचा कॅम्प, संगमेश्वरचा पश्चिम भाग तर कोरोनाने कवेत घेतला आहे. शहर व तालुक्यात अवघ्या काही दिवसात पाचशे पेक्षा अधिक रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील गणेशोत्सवावर त्याचा परिणाम होणार आहे. विविध मंडळांनी साध्या पध्दतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात 450 पेक्षा अधिक मंडळे गणेशोत्सव साजरा करतात. यावेळी ही संख्या घटणार आहे. बाल गणेश मंडळांची संख्याही मर्यादित असेल.

यंदा सार्वजनिक ऐवजी घरगुती गणेशोत्सव

ग्रामीण भागातही अडीचशे पेक्षा अधिक मंडळे उत्सव साजरा करतात. यावर्षी कोरोनामुळे असलेले निर्बंध, वाढती रुग्णसंख्या यामुळे मंडळांची संख्या खूपच मर्यादित असू शकेल. पाच दिवसावर आलेल्या उत्सवाची तयारी दिसून येत नाही. प्रत्येक गावात कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे यंदा सार्वजनिक ऐवजी घरगुती गणेशोत्सव साजरा करण्यावर सर्वांचा भर आहे. यातूनच एक गाव एक गणपती ही संकल्पना पुढे येत आहे. उत्सवावर असलेले निर्बंध व कोरोनाची भीती पाहता विविध मंडळाचे कार्यकर्ते बॅकफूटवर आले आहेत. मंडळाच्या बैठका व कार्यकारिणीचे सोपस्करही अनेक मंडळांकडून अद्याप करण्यात आले नाहीत. त्यामुळे एक गाव एक गणपती ही संकल्पनाच बहुतेक गावांमध्ये स्विकारली जाऊ शकेल. पोलीस प्रशासन येत्या दोन दिवसात विविध गावातील मंडळांच्या बैठका घेणार आहेत. यानंतर चित्र स्पष्ट होईल. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या काही गावांमध्ये यंदा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाण्याची शक्यता दिसत नाही.


वर्गणी बंद

गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचे संकट आहे. उद्योग, व्यवसाय अजूनही रुळावर येत नाहीत. सर्वच घटक अडचणीत आहेत. त्यामुळे शहर व तालुक्यात कुठेही वर्गणी गोळा केली जात नाही. यावर्षी वर्गणीला पूर्णविराम मिळणार आहे. उत्सवाचे स्वरूप जेमतेम असणार आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी जेमतेमच मूर्ती मागविल्या आहेत.

संपादन - रोहित कणसे


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com