VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...

अरुण मलाणी / केशव मते
Wednesday, 5 August 2020

भरपूर शिकण्याच्‍या त्‍याच्‍या जिद्दीपुढे आर्थिक अडचणीसह अनेक गतिरोधक होते. परंतु, अडथळ्यांची ही शर्यत पार करत समाजातील दात्‍यांच्‍या पाठबळावर स्‍वप्‍नीलने शिकण्याच्‍या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवली.

नाशिक : सामान्‍य रिक्षाचालक जगन्नाथ पवार यांचा मुलगा स्‍वप्‍नील याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्‍या परीक्षेत यश मिळवले. प्रकल्‍प अभियंतापदावर नोकरीची जबाबदारी सांभाळून अभ्यासातही सातत्य ठेवत स्‍वप्‍नीलने पहिल्‍याच प्रयत्‍नात यश मिळवत अधिकारीपदाला गवसणी घातली. 

नोकरी सांभाळून अभ्यास करत स्वप्नील बनला अधिकारी
निकाल जाहीर होताच पवार कुटुंबीयांनी औक्षण करत, पेढा भरवत स्‍वप्‍नीलचे अभिनंदन केले. आई कल्‍पना पवार या वेळी काहीशा भावूक झाल्‍या होत्‍या. अगदी शालेय जीवनापासून अभ्यासात हुशार असलेल्‍या स्‍वप्‍नीलने पेठे विद्यालयातून दहावीत ९३ टक्‍के गुण मिळविले होते. भरपूर शिकण्याच्‍या त्‍याच्‍या जिद्दीपुढे आर्थिक अडचणीसह अनेक गतिरोधक होते. परंतु, अडथळ्यांची ही शर्यत पार करत समाजातील दात्‍यांच्‍या पाठबळावर स्‍वप्‍नीलने शिकण्याच्‍या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवली. केटीएचएम महाविद्यालयातून विज्ञान शाखेत बारावीनंतर जेईई परीक्षेच्‍या माध्यमातून पुण्यातील विश्‍वकर्मा इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमध्ये प्रवेश मिळविला. केमिकल इंजिनिअरिंग पूर्ण करताना प्‍लेसमेंटच्‍या माध्यमातून त्‍याला नोकरीदेखील लागली. अनुभव घेण्याच्या उद्देशाने साधारण दीड वर्षापूर्वी तो फॅब्‍स इंटरनॅशनलमध्ये प्रकल्‍प अभियंता म्‍हणून रुजू झाला.

 पहिल्‍याच प्रयत्‍नात यूपीएससी परीक्षेत यश

दिवसभर नोकरी करायची आणि मिळेल त्‍या वेळेत दिवसभरात सरासरी चार तास अभ्यास करायचा, अशा सातत्यातून स्वप्नीलने पहिल्‍याच प्रयत्‍नात यूपीएससी परीक्षेत यश मिळविले. २४ तास अभ्यासात व्‍यस्‍त राहाण्यापेक्षा वेळेचे योग्‍य व्‍यवस्‍थापन करत कमी वेळ पण प्रभावी पद्धतीने उमेदवारांनी अभ्यास करावा. उपलब्‍ध संसाधनांचा योग्‍य वापर करता आला पाहिजे, असे स्‍वप्‍नीलने सांगितले. स्‍पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना प्रा. राम खैरनार यांनी मुलाखत तंत्रविषयक मार्गदर्शन केल्‍याचे त्याने सांगितले. 

हेही वाचा > जेव्हा साधु महाराजांच्या कुटियाच्या आवारातच घडतो धक्कादायक प्रकार...पोलीसांनी केला खुलासा

कृतज्ञता व्‍यक्‍त करावीशी वाटते

यूपीएससी परीक्षा देत इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमध्ये जाण्याचे ध्येय ठेवले होते. पहिल्‍याच प्रयत्‍नात यश मिळाल्‍याने विशेष आनंद होतोय. आजवरच्‍या प्रवासात आई-वडिलांसह ज्‍यांनी ज्यांनी पाठबळ दिले, त्‍यांच्‍याप्रति कृतज्ञता व्‍यक्‍त करावीशी वाटते. -स्‍वप्‍नील पवार 

सामान्‍य परिस्‍थिती असताना मुलांना खूप शिकविण्याचे ध्येय ठेवले होते. माझी जी काही संपत्ती आहे, ती मुलेच आहे, असे समजून त्‍यांच्‍या शिक्षणावर खर्च केला. आज स्‍वप्‍नीलने मिळविलेल्‍या यशाने भारावून गेलो आहे. कष्टांची जाणीव ठेवत त्‍याने यश मिळविल्‍याचा अभिमान आहे. -जगन्नाथ पवार, स्वप्‍नीलचे वडील. 

हेही वाचा > धक्कादायक! रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईंकाकडून रुग्णालयाची तोडफोड....काय घडले नेमके? सीसीटिव्हीतून उघड

स्‍वप्‍नील शालेय जीवनापासून अभ्यासात हुशार राहिला आहे. नोकरी सांभाळत स्‍पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणे सोपे नाही. त्‍याने यूपीएससीमध्ये यश मिळविताना सामान्‍य कुटुंबातील युवकांपुढे आदर्श निर्माण केला आहे. सर्व कुटुंबीयांना खूप आनंद होतोय. -पूजा पवार, स्‍वप्‍नीलची बहीण  

रिपोर्ट - अरुण मलाणी / केशव मते

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: upsc result 2019 swapnil pawar success story nashik marathi news