esakal | Nitin Gadkari | महामार्गाचे विस्तारीकरणासह कॉंक्रिटीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari | महामार्गाचे विस्तारीकरणासह कॉंक्रिटीकरण

Nitin Gadkari | महामार्गाचे विस्तारीकरणासह कॉंक्रिटीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : रोडकरी म्हणून प्रसिद्ध असलेले केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा नाशिक व ठाणेकरांच्या पदरात भरभरून गिफ्ट देताना अनेक महिन्यांपासून खाच-खळग्यांमुळे शारीरीक व्याधी तसेच, वाहतुक कोंडीने त्रस्त झालेल्या वाहनधारकांना दिलासा दिला. नाशिक-मुंबई चार पदरी महामार्गाचे सहा पदरीत रुपांतर करताना संपुर्ण रस्ता सिमेंट कॉंक्रिटचा करण्याची घोषणा त्यांनी केली. त्यासाठीपाच हजार कोटी रुपयांची तरतुद केली जाणार असून, नाशिक-मुंबई अंतर दोन तासांवर आणले जाणार आहे. त्याचबरोबर नाशिक रोड ते द्वारका या दरम्यान एलिव्हेटेड पद्धतीच्या डबलडेकर उड्डाणपुलाची घोषणा करतानाच त्यासाठी सोळाशे कोटी रुपयांची तरतुद केल्याचे सांगितले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ६३० किलोमीटर लांबीच्या व दोन हजार ४८ कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांचे लोकार्पण व कोनशिला अनावरण श्री. गडकरी यांच्या हस्ते सोमवारी (ता. ४) ऑनलाईन पद्धतीने झाले. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री छगन भुजबळ व केंद्रीय पंचायत राज्यमंत्री व भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्या मागणीच्या अनुषंगाने श्री. गडकरी यांनी मुंबई-नाशिक महामार्गाचे सहा पदरीकरण करण्याची घोषणा करताना नाशिक- गोंदे, वडपेपर्यंतचा रस्ता सिमेंट कॉंक्रीटचा करण्याची घोषणा केली. त्यासाठी पाच हजार कोटी रुपये गुंतवणुक केली जाणार आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याबरोबरच ठाणे ते वडपे रस्ता आठ पदरी करण्यासाठी आठशे कोटी रुपयांची गुंतवणुक केली जाणार आहे. दोन्ही रस्ते समृद्धी महामार्गाला जोडले जाणार आहेत. पालकमंत्री भुजबळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, कृषी मंत्री दादा भुसे, खासदार उन्मेष पाटील, हेमंत गोडसे यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार ॲड. माणिक कोकाटे, दिलीप बनकर, नितीन पवार, ॲड. राहुल ढिकले, ॲड. राहुल आहेर, सिमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, महापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती गणेश गिते, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर आदी उपस्थित होते.

एलिव्हेटेड उड्डाणपूल

नाशिक रोडच्या दत्तमंदीर चौक ते द्वारका या दरम्यान एलिव्हेटेड पद्धतीचा उड्डाणपुल उभारला जाणार असून, त्यासाठी १६०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. खालच्या भागात शहर वाहतुकीसाठी चार पदरी मार्ग, त्यावर अवजड वाहनांसाठी उड्डाणपुल व त्यावर आणखी एक मेट्रोसाठी उड्डाणपुल केला जाणार आहे. दोन वर्षात उड्डाणपुल तयार करण्याचे आश्‍वासन देतानाच श्री. गडकरी यांनी न्हाई व महामेट्रोमार्फत खर्च वाटून घेतला जाणार असल्याचेही नमूद केले.

खासदार गोडसेंची माघार

दोन महिन्यांपुर्वी के. के वाघ ते आडगाव दरम्यान उड्डाणपूलाचे उद्‌घाटन करणारे खासदार गोडसे यांनी आजच्या सोहळ्यात सपशेल माघार घेतली. मी केवळ उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला, उड्डाणपुलाचे लोकार्पण व कोनशिला अनावरण समारंभ, तर गडकरींच्या हस्ते आज झाल्याचे त्यांनी जाहीर केले.

गडकरींच्या घोषणा

 • ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी मेट्रोला ध्वनिरोधक यंत्रणा

 • पोलिस व्हॅन व ॲम्ब्युलन्सवरील सायरन बंद करणार

 • सायरनऐवजी भारतीय वाद्यांच्या धुन लावणार

 • शिर्डी-सिन्नर-त्र्यंबक या धार्मिक स्थळांसाठी १०२६ कोटींचा महामार्ग

 • सटाणा- मनमाड महामार्गासाठी ३३१ कोटींची तरतुद

 • नांदगाव-मनमाड-नस्तनपुर दरम्यान रल्वेवर उड्डाणपुल

 • सुरत ग्रीन फिल्डवरून वसईमार्गे वांद्रे-वरळीपर्यंत उड्डाणपुलाचे नियोजन

 • मिरा भाईंदर, भिवंडी, बदलापुर येथे लॉजिस्टीक पार्क

 • नाशिक शहरापासून समृद्धी महामार्गापर्यंत रस्ते विकास.

गडकरींच्या सूचना

 • सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गालगत ट्रक टर्मिनस उभारा

 • नागपूरच्या धर्तीवर उड्डाणपुलाखाली चित्रे काढावी

 • राज्याने १६ कोटी रुपये प्रतिहेक्टर भुसंपादनाचा दर कमी करावा

 • ग्रीन फिल्डवर स्मार्ट सिटी उभारावी

 • नाशिक महापालिकेने लॉजिस्टीक पार्क उभारावे

 • डांबरी रस्त्यांवर सिमेंटचा थर लावल्यास रस्ते खड्डेमुक्त

  गुजरात-महाराष्ट्र सरकारने समुद्राला मिळणाऱ्या पाण्याचा वापर करावा

 • अपघात कमिटीमार्फत अपघात शुन्य प्रवासासाठी खासदारांनी प्रयत्न करावे

loading image
go to top