Nashik : आयुक्तांच्या खुर्चीवरील जप्ती टळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik muncipal corporation

आयुक्तांच्या खुर्चीवरील जप्ती टळली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : देवळाली शिवारातील क्रीडांगणासाठी राखीव असलेल्या भूखंडाच्या भूसंपादनाचा तीन कोटींचा निधी अडवून ठेवल्याने आयुक्तांच्या खुर्चीसह, वाहन जप्त करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या. परंतु, स्थायी समितीच्या मान्यतेने तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने प्रशासनाची इभ्रत वाचली.

देवळाली शिवारात क्रीडांगणासाठी दहा हजार चौरस मीटर क्षेत्र आरक्षित करण्यात आले होते. सन २०१९ मध्ये महापालिकेने जागा ताब्यात घेतल्यानंतर संबंधित जागा मालकांनी वाढीव मोबदला देण्याची मागणी केली. त्यासाठी जिल्हा न्यायालयात दावादेखील केला. न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर महापालिकेने या निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेत आव्हान दिले. या दरम्यान न्यायालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे काही प्रमाणात रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले.

अद्यापही निर्देशित रक्कम महापालिकेने अदा न केल्याने पंधरा टक्के व्याज आकारणी करून तीन कोटी रुपये जमा करण्याच्या सूचना दिल्या. सदरची रक्कम अदा न केल्याने महापालिकेला अवमान नोटीस बजावण्यात आली. तरीही महापालिका प्रशासनाने रक्कम आदा केली नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांची खुर्ची, टेबल व वाहन जप्त करण्याचे आदेश देण्यात आले. शुक्रवारी (ता. १२) न्यायालयाचा बेलिफ खुर्ची जप्तीसाठी थेट आयुक्तांच्या कार्यालयात आल्यानंतर अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. स्थायी समितीच्‍या तातडीच्या मान्यतेनंतर पाच जमीन मालकांना विविध रकमांचे तीन कोटी

रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आल्याने महापालिका प्रशासनावरची नामुष्की टळली.

loading image
go to top