Nashik : कॉंग्रेसतर्फे महागाई विरोधात आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress
कॉंग्रेसतर्फे महाघाई विरोधात आंदोलन

कॉंग्रेसतर्फे महागाई विरोधात आंदोलन

मालेगाव : केंद्रातील मोदी सरकारच्या सात वर्षाच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले आहे. इंधन दरवाढीबरोबरच खाद्यतेल, डाळी आदींच्या किमती सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. उज्वला योजनेच्या माध्यमातून गरीब जनतेला मोफत गॅस देण्याचे आश्‍वासन देऊन मोदींनी सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे. भारत सरकार शेजारच्या देशात नेपाळ, भूतान, बांगलादेशला पेट्रोल ३० रुपये व डिझेल २२ रुपये देत आहे. भारतीय नागरिकांना त्याच पेट्रोल व डिझेलसाठी शंभरापेक्षा अधिक रुपये मोजावे लागत आहे.

शासनाने इंधन दरवाढ तसेच महागाई कमी करावी, या मागणीसाठी कॉंग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर नीचांकी पातळीवर असताना भाजप सरकार विविध कर लावून नागरिकांची लूट करीत आहे. पेट्रोल व डिझेलवर १८ रुपये रस्ते विकास सेल व ४ रुपये कृषी सेलच्या माध्यमातून घेतली जात आहे. केंद्राने पेट्रोल, डिझेल करामधून मागील सात वर्षात तब्बल २२ लाख कोटी रुपयांची नफेखोरी केली आहे. एलपीजी सिलिंडर हजाराच्या घरात गेले आहे. उज्वला योजनेतील लाभार्थ्यांना महागडे सिलिंडर घेण्यास परवडत नाही. काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या काळात पेट्रोल ७२ रुपये तर गॅस सिलिंडर ४०० रुपयांना मिळत होते.

डिझेल महागल्याने सार्वजनिक - प्रवास व मालवाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे. केंद्र शासनाने इंधनासह जीवनावश्‍यक वस्तूंचे भाव तातडीने कमी करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या वेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे, वाय. के. खैरनार, पंढरीनाथ पितृभक्त, सतीश पगार, एस. एस. देवरे, रामभाऊ हाके, नितीन बच्छाव, एकनाथ देसले, दत्तू खैरनार, डॉ. अरुण पठाडे आदी उपस्थित होते.

loading image
go to top