esakal | कोरोना रुग्णांना नातेवाइकांनी पुरविले डबे, तरी पाऊण कोटींचे बिल
sakal

बोलून बातमी शोधा

meal

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने उभारलेल्या कोविड सेंटर बरोबरच बिटको व झाकिर हुसेन रुग्णालयात जेवण पुरविण्याचा ठेका वादात सापडला आहे. तीन महिन्यात तब्बल ७५ लाख रुपयांचे बिल काढले आहे.

कोरोना रुग्णांना नातेवाइकांनी पुरविले डबे, तरी पाऊण कोटींचे बिल

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने उभारलेल्या कोविड सेंटर बरोबरच बिटको व झाकिर हुसेन रुग्णालयात जेवण पुरविण्याचा ठेका वादात सापडला आहे. तीन महिन्यात तब्बल ७५ लाख रुपयांचे बिल काढले आहे. ८५ टक्के रुग्ण होमआयसोलेशनमध्ये, तर बहुतांश रुग्णांना घरचे डबे पुरविले गेले असताना सरसकट सर्वच दाखल रुग्णांचे बिल काढण्यात आल्याचा संशय व्यक्त करत भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी संशयास्पद बिलांचे प्रस्ताव नामंजूर करण्याची मागणी आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली आहे. (contract to provide meals at nmc covid Center bytco and zakir hussain Hospital has been disputed)

महापालिकेने कोविड सेंटरमध्ये कोरोना संसर्गित दाखल रुग्णांवर उपचार सुरु असताना रुग्णाकरिता चहा, भोजन, नाश्‍त्याच्या बिलापोटी ठेकेदारांना मेरी व समाजकल्याण कोविड सेंटर, बिटको हॉस्पिटलसाठी १९ लाख ८० हजार, ठक्कर डोमकरिता पंचवीस लाख तर बिटको रुग्णालयासाठी तीस लाख पन्नास हजार रुपये बिल अदा करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीवर मंजुरीसाठी सादर केला आहे. प्रस्तावामध्ये एकूण किती रुग्णांना भोजन देण्यात आले, याचा उल्लेख नाही. भोजन पुरवठा करण्याचे ठेके कधी काढले, तसेच स्पर्धात्मक निविदा न मागविता ठेकेदार निश्‍चित करण्यात आले. ठेकेदारांनी रुग्णांना चहा, नाश्‍ता, भोजन दिल्याची यादी सादर केली नाही. रुग्णांना भोजन व चहा, नाश्‍ता दिल्याचे ऑडिट झाले नाही. रुग्णांना नातेवाईकांकडून डबे पुरविले जात असल्याने त्या रुग्णांचे बिल ही काढले जात आहे. त्यामुळे पाऊण कोटी रुपयांचे बिल काढताना ठराविक ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून बिले काढली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: नाशिकमधील पंचवटी विभागात ४ महिन्यांपासून मृत्यूदर वाढताच

ठेकेदाराच्या बिलातून वजावट का झाली नाही?

कोविड सेंटरमध्ये रुग्णांना महापालिकेमार्फत मोफत जेवणाची सुविधा असली तरी कोविड सेंटरमधील रुग्णांना पोषक आहार देण्याच्या उद्देशाने नातेवाइकांनी घरूनच डबे पुरविले मग घरून जेवण पुरविल्यानंतर ठेकेदाराच्या बिलातून वजावट का झाली नाही, १३ मेपर्यंत दोन लाख १४ हजार रुग्ण कोरोनाबाधित आढळले. त्यातही ८५ टक्के रुग्ण लो रिस्कमध्ये असल्याने होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. याचाच अर्थ ३३ हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले. वास्तविक ही आकडेवारी वर्षभराची आहे. त्यातही खासगी रुग्णालयांमधील रुग्णांचादेखील आकडेवारीत समावेश आहे.

सरसकट सर्वांचे बिल

महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये तीन महिन्यात सरासरी दहा हजारांपर्यंत रुग्णांवर उपचार झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. १२७ रुपये प्रमाणे विचार केला तरी अधिकाधिक पंधरा लाख रुपये जेवणाचे बिल येणे अपेक्षित असताना ७५ लाख रुपयांचे बिल सादर केल्याने संशय निर्माण झाला आहे. यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बहुतांश रुग्णांच्या नातेवाईकांकडून घरचे डबे पुरविले जात असताना सरसकट सर्वच रुग्णांच्या जेवणाचे बिल कसे निघाले असा सवाल उपस्थित होत आहे.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यातील ननाशी परिसरात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का

महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये भोजन पुरवठादार ठेकेदारांची चौकशी व्हावी. आतापर्यंतच्या भोजन पुरविलेल्या ठेक्याची चौकशी व्हावी.

- जगदीश पाटील, गटनेते भाजप.

(contract to provide meals at nmc covid Center bytco and zakir hussain Hospital has been disputed)