esakal | कशी करायची शेती? ढोबळ्या मिरचीला 2 रुपये भाव; शेतकऱ्याने सगळी रोपे उपटली
sakal

बोलून बातमी शोधा

Corona causes damage to agriculture and farmers

ढोबळ्या मिरचीला 2 रुपये भाव; शेतकऱ्याने सगळी रोपे उपटली

sakal_logo
By
माणिक देसाई

निफाड (जि. नाशिक) : सलग दोन वर्ष कोरोनाचा (Corona) फटका शेतीला बसलेला असताना यंदा शेतीत आशादायक चित्र निर्माण होईल अशी अपेक्षा बाळगून असलेल्या बळीराजाची घोर निराशा झाली आहे. सर्वच पीक जोमात असल्याने उत्पन्नही वाढले, मात्र त्याचा उलटा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. आवक वाढल्याने शेतीमालाच्या उत्पन्नात सतत घसरण सुरू आहे. अशा स्थितीत ना बाजार हस्तक्षेप योजना शेतकऱ्यांचा मदतीला आली ना मायबाप सरकार. शेती करावी तरी का आणि कशी असा प्रश्न शेतकरी हताशपणे सरकारला विचारत आहे. भाव एकदम एवढे खाली कसे येतात हे अजूनही न उलगडलेले कोडे आहे.

काबाडकष्ट करून पिकवलेल्या मालातून उत्पादन खर्चही निघत नाही

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सलग पंधरा दिवसापासून कवडीमोल भावात नगदी पीक विक्री होत आहे. टोमॅटो, शिमला, वांगे, कोबी, फ्लॉवर, कोथिंबीर, शेपू, मेथी, काकडी, कारले, दुधी, सगळं काही अवघे एक ते दोन रुपये किलो दराने विकत जात आहे. टोमॅटो, शिमला मिरची हा शेतमाल शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करत माल पिकवला, मात्र उत्पादन खर्चही निघत नसल्याने अक्षरशः रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आलेली आहे. टोमॅटोचा अक्षरशः चिखल पाहायला मिळत आहे. भाजीपाला शेतात तसाच पडून आहे, तो बाजार समितीत विक्रीसाठी आणण्याचा खर्च सुद्धा वसूल होत नाही. टोमॅटो, शिमला मिरची, कारले, दोडके, गिलके, दुधी भोपळा किमान ३० प्रति जाळी भाडे आणि २० तोडणीचा खर्च येतो. विकला जातो अवघा तीस ते चाळीस रुपये दराने. ही विसंगती कशी भरून निघणार हा प्रश्न आहे. अशावेळी शेतकऱ्यांसाठी असलेली बाजार हस्तक्षेप योजनाही कुठे दिसत नाही.

हेही वाचा: एटीएममधून परस्पर 50 हजार गायब! सायबर पोलिसांत तक्रार

शेती व्यवसाय ठरतोय जुगार

ताळमेळच बसत नसल्याने शेती सर्वांत मोठी जुगार होऊन बसली आहे. खते, औषध, शेतमजुरी, मजुरीचे दर गगनाला भिडल्याने शेती तोट्यात जात आहे. तुलनात्मक विचार केला तर दहा वर्षांपूर्वी रासायनिक खतांच्या किमती सातशे ते आठशे रुपये पन्नास किलोच्या गोणीसाठी होते. टोमॅटो किंवा इतर माल तेव्हा दोनशे ते अडीचशे रुपये विकला जायचा. आज मात्र खताची गोणी पंधराशे रुपयाला आणि भाजीपाला मात्र त्यापेक्षा निम्म्याच दराने विकावा लागत आहे. केवळ इतर किमती वाढल्या, पण शेतीमालाच्या किमती कमी झाल्या आहे. त्यामुळे शेती सर्वांत मोठा जुगार ठरला आहे.

हेही वाचा: उद्योग, व्यापाराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध: डॉ. भारती पवार

ढोबळी मिरची उपटून फेकण्याची वेळ

''शेती हा आतबट्ट्य़ाचा व्यवसाय बनला आहे. लाखो रुपये शेतीत घालायचे, काबाडकष्ट करायचे आणि उत्पादन खर्चही मिळत नाही. मी पिकवलेल्या मालाला दोन रुपये किलो भाव मिळाल्याने ढोबळी मिरची उपटून फेकण्याची वेळ आली.'' - अनिरुद्ध पवार, शेतकरी, दात्याने.

''आधीच शेतकरी कोरोनाचा सामना करीत आहे. सलग दोन वर्षांपासून शेतीच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. यंदा चांगले उत्पादन अपेक्षित असताना शेतमालाचे भाव कोसळले, उत्पादन खर्च निघणे दुरापास्त झाले, त्यामुळे कुटुंबकबिला कसा चालवावा असा यक्षप्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला आहे.'' - छोटूकाका पानगव्हाणे, अध्यक्ष, द्राक्ष संघर्ष समिती, निफाड

loading image
go to top