esakal | कोरोना महामारीत सीटी स्कॅनचे मार्केट पाचपटीने ‘अप'
sakal

बोलून बातमी शोधा

ct scan

कोरोना महामारीत सीटी स्कॅनचे मार्केट पाचपटीने ‘अप'

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : कोरोना विषाणू संसर्गाच्या (coronavirus) धास्तीमुळे रुग्ण स्वतःच सीटी स्कॅन (ct scan) करण्याचा निर्णय घेतात. ही झाली एक बाजू. दुसरे म्हणजे, इलाज करणाऱ्या डॉक्टरांपैकी (doctor) अनेक जण उपचाराआधी सीटी स्कॅन करून येण्याचा सल्ला देतात. त्याचा परिणाम म्हणजे, राज्यात कोरोना महामारीमध्ये सीटी स्कॅनचे ‘मार्केट’ पाचपटीने ‘अप’ झालेय.(market) मुळातच, सीटी स्कॅनच्या किरणोत्सर्गामुळे अवयवांना येणाऱ्या कमकुवततेकडे फारशा गांभीर्याने पाहिले जात नाही, तसेच सीटी स्कॅनसाठी एकासोबत जाणाऱ्या दोन ते तिघांमुळे होणाऱ्या गर्दीने सीस्टी स्कॅन सेंटर कोरोना विषाणूंचे स्प्रेडर्स ठरताहेत. (super spreader)

कोरोना महामारीत सीटी स्कॅनचे मार्केट पाचपटीने ‘अप'

सीटी स्कॅन ‘मार्केट’ हे वधारण्यामागील अर्थकारणाचा ढोबळमानाने आढावा घेतल्यावर धक्कादायक माहिती पुढे आली, ती म्हणजे, गरज नसताना दिवसाला किमान ४० हजारांच्या आसपास सीटी स्कॅन करून घेतले जाताहेत. सरकारने निश्‍चित करून दिलेल्या दराचा विचार केला, तरीही दिवसाला बारा कोटी रुपयांचा चुराडा होतो आहे. पण त्याहीपलीकडे जाऊन विनाकारण किरणोत्सारामुळे अवयवांवर होणाऱ्या दुष्परिणामांकडे का दुर्लक्ष केले जाते, असा प्रश्‍न अनुत्तरित राहतोय. निष्ठेने शुश्रूषा करणारे डॉक्टर, वैद्य आणि रेडिओलॉजिस्ट यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक वेळी सीटी स्कॅन करण्याची आवश्‍यकता नाही. कोरोना विषाणूचा तुम्हाला त्रास नाही, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ९७ ते ९८ इतके आहे मग सीटी स्कॅन करण्याची गरज नाही, असा सल्ला डॉक्टर देतातही. अनेकदा रुग्ण त्याकडे लक्ष देत नाहीत ही वस्तुस्थिती आढळते. दुसरी बाजू म्हणजे, रुग्णांची तपासणी करण्याऐवजी चाचण्यांवर उपचाराची दिशा ठरविणाऱ्यांपैकी अनेक जण सीटी स्कॅनचा स्कोअर पाच असल्यावर घरी इलाज घ्या, त्याहून अधिक स्कोअर असल्यावर उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हा, असा सल्ला देणारे आढळतात.

हेही वाचा: ग्राउंड रिपोर्ट : कोरोना पॉझिटिव्ह शिक्षकांना जिल्हा चेक पोस्टवर ड्युटी ?

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सीटी स्कॅन

मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रोहित ठाकरे म्हणाले, की प्रत्येकाला सीटी स्कॅनची गरज नाही. विषाणूची बाधा झाल्यावर पहिल्या दोन ते तीन दिवसांमध्ये मुळीच नाही. खोकला असेल, दम लागत असेल आणि रक्तातील ऑक्सिजन ९५ पेक्षा कमी असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सीटी स्कॅन करायला हरकत नाही. पण तरीही तीन मिनिटे चालल्यावर ऑक्सिजनची पातळी किती आहे हे ‘पॅनिक’ होण्यापेक्षा आपण पाहायला हवे. त्याचबरोबर केवळ सीटी स्कॅनच्या ‘स्कोअर’वर इलाज ठरत नाही. इलाजासाठी लक्षणे, ऑक्सिजनची पातळी, ताप, खोकला, धाप अशा साऱ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. एवढेच नव्हे, तर रुग्णालयातील उपचारानंतर घरी जाताना सीटी स्कॅन करण्याची गरज नाही. मात्र ‘डिस्चार्ज’ करताय म्हटल्यावर सीटी स्कॅनचा ‘स्कोअर’ कमी झाला की नाही हे बघायला हवे आणि त्यासाठी स्कॅन करून घ्यायला हवे, असे बऱ्याच नातेवाइकांकडून डॉक्टरांना ऐकावे लागते. मुळातच, फुफ्फुसांमधील स्कॅनमध्ये दिसणारे बदल जाण्यासाठी किमान तीन आठवड्यांचा कालावधी लागतो. म्हणून पुन्हा स्कॅन करून बघण्यात काहीच अर्थ नाही. डॉक्टरांना स्कॅन करायचा की नाही हे नातेवाइकांनी ठरवून द्यायला हवे.

हेही वाचा: Sakal Impact : प्रवाशांनो..पळवाटा शोधाल तर पडेल महागात!

‘झीरो स्कोअर’चा बिनधास्तपणा ठरतो घातक

कोरोना विषाणू संसर्गाच्या चाचणीसाठी सीटी स्कॅन केल्यावर अनेकदा ‘स्कोअर झीरो’ येतो. त्यामुळे बहुतांश जण बिनधास्त होतात. स्वतःकडे लक्ष देत नाहीत. त्यातून प्रकृतीत बिघाड होण्यास सुरवात झाल्यावर स्वॅब चाचणी केली जाते आणि त्यात ‘पॉझिटिव्ह’ आल्यावर मानसिक ताण वाढत जातो. अनेकदा उपचाराला शारीरिक प्रतिसाद मिळण्यात अडचणी येऊ लागतात. प्रसंगी मृत्यूला सामोरे जावे लागते. याखेरीज तोपर्यंतच्या बिनधास्तपणातून विषाणू संसर्गाची लागण अनेकांपर्यंत पोचलेली असते. त्याचप्रमाणे सुरवातीला ‘स्कोअर झीरो’ असला, तरीही उपचारानंतर ‘स्कोअर’ वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सहापट खर्च कशासाठी करताय?

अवयवांवरील दुष्परिणामांच्या अनुषंगाने एक सीटी स्कॅनचा परिणाम हा तीनशे एक्स-रेइतका असतो, अशी मांडणी वैद्यकीय क्षेत्रातून झाली आहे. पण ज्येष्ठ रेडिओलॉजिस्ट यांच्या म्हणण्यानुसार सीटी स्कॅन मशिन अगदीच जुने असेल, तर ही स्थिती आपणाला नाकारता येत नाही. मात्र आता अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे एक सीटी स्कॅन हे पन्नास एक्स-रेच्या परिणामांइतके आहे, असेही त्यांच्याकडून स्पष्ट केले जाते. सीटी स्कॅन हा उपचाराचा एक भाग असल्याचे मान्य करत रेडिओलॉजिस्ट म्हणताहेत, की सीटी स्कॅनच्या तुलनेत एक्स-रेमधून तुम्हाला ८० ते ९० टक्के निश्‍चित माहिती मिळत असताना सहापट खर्च अधिक करण्याचे काहीच कारण नाही. त्याच वेळी किरणोत्साराचा दुष्परिणाम कमी होतो. एक्स-रेसाठी चारशे ते पाचशे रुपये शुल्क आकारले जाते.

राज्यात सीटी स्कॅनसाठी साडेचार ते पाच हजार रुपये आकारले जात होते. सरकारने सीटी स्कॅनसाठी दोन हजार, अडीच हजार, तीन हजार रुपये असे शुल्क निश्‍चित केले आहे. त्यानुसार राज्यभरातील सीटी स्कॅन केंद्रांनी कोरोना काळात रुग्णसेवेसाठी हातभार लावलेला आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी आवश्‍यकतेनुसार सीटी स्कॅन आणि तेही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करून घेणे गरजेचे आहे.

-डॉ. संजय देसले, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य इंडियन रेडिओलॉजिस्ट असोसिएशन