esakal | नाशिक शहरात तिसऱ्या लाटेचे संकेत? रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

corona

नाशिक शहरात तिसऱ्या लाटेचे संकेत? रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोनाची दुसरी लाट (Corona second wave) ओसरत असताना तिसऱ्या लाटेची (Third wave) तयारी होत आहे. संभाव्य कालावधीपूर्वीच शहरात कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्याचा संशय महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने व्यक्त केला आहे. सलग दोन दिवस पन्नासच्या पुढे रुग्णसंख्येचा आकडा दिसून येत आहे. बिटको रुग्णालयात छातीचा एक्स-रे (X-Ray) काढणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. महापालिकेच्या कोविड (Covid) रुग्णालयांत रुग्ण भरतीसाठी विचारपूस होऊ लागल्याने तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

हेल्पलाइन क्रमांकावर होतेय विचारणा

गेल्या वर्षी शहरात मार्चमध्ये कोरोनाची लाट आली. ऑक्टोबरपर्यंत ती ओसरली. त्यानंतर या वर्षाच्या जानेवारीअखेर कोरोनारुग्ण वाढू लागले. दुसऱ्या लाटेला गर्दी, निष्काळजीपणा कारणीभूत ठरला होता. कोरोनाची दुसरी लाट जूनअखेर ओसरण्यास सुरवात झाली. आतापर्यंत दोन लाख २५ हजार ११६ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. पावणेदोन वर्षांत कोरोनामुळे तीन हजार ९७० मृत्यू झाले आहेत. ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ४५५, तर १९६ नमुने प्रलंबित आहेत. एप्रिल व मेमध्ये कोरोनाबाधितांची संख्या प्रतिदिन अडीच हजारांच्या पुढे होती. लाट ओसरत असताना गेल्या आठवड्यात १६ पर्यंत रुग्ण आढळून आल्याने कोरोना संसर्गाची लाट पूर्णपणे ओसरत असल्याचे चित्र होते.

मात्र, दोन दिवसांत पन्नासच्या पुढे कोरोनारुग्ण आढळून येत असल्याने वैद्यकीय विभागासमोरची चिंता वाढली आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये १५ दिवसांपर्यंत एचआरसीटी (HR-CT) पूर्णपणे बंद होते. मात्र, दोन दिवसांत आठ ते दहा नागरिकांनी स्कॅन केले. कोरोनासाठी महापालिकेकडून उपलब्ध करून दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर तीन-चार दिवसांपासून २० ते २५ लोकांकडून विचारणा होत आहे. त्यामुळे हे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत मानले जात असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. बापूसाहेब नागरगोजे व डॉ. आवेश पलोड यांनी केले आहे.

हेही वाचा: रस्त्याचे काम अपूर्णच अन् श्रेयवादासाठी राजकीय सोशल वॉर सुरू

दोन डोस झाले असले तरी सावधानता हवी

दुसऱ्या लाटेनंतर लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केल्याने सार्वजनिक ठिकाणी पुन्हा गर्दी वाढली आहे. गर्दीत मिसळताना सोशल डिस्टन्स, मास्क व सॅनिटायझरचा वापर होत नाही. राजकीय पक्षांचे मोर्चे व कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत असल्याने तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरताना दिसत आहे. शहरात कोविड प्रतिबंध लशीचा पाच लाख ६८ हजार ७४४ जणांनी पहिला डोस, तर दोन लाख १३ हजार ३५६ जणांनी दुसरा डोस, असे एकूण सात लाख ८२ हजार १०० जणांनी डोस घेतले आहेत. मात्र, दोन डोस घेतल्याने नागरिकांकडून काळजी घेतली जात नाही. आजार अंगावर काढण्याची प्रवृत्ती बळावत असल्याने त्यातून कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: नाशिक : गुजरात पोलिसांच्या 'त्या' कारवाईची अखेर उकल

loading image
go to top