Nashik | पांढरे सोने आठ हजारी पार! दर वाढले पण, एकरी उत्पादनात घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cotton

पांढरे सोने आठ हजारी पार! दर वाढले पण, एकरी उत्पादनात घट

sakal_logo
By
संदीप पाटील

विराणे (जि. नाशिक) : सध्या माळमाथ्यात कापूस वेचणीची लगबग सुरू आहे. कापूस आजमितीला आठ हजार रूपये क्विंटल दराने खरेदी केला जात आहे. काही दिवसांपूर्वी नऊ हजारांपेक्षा अधिक दर मिळत होता. दरवर्षीपेक्षा यावर्षी मिळालेला भाव हा सर्वाधिक आहे. एकीकडे कधी नव्हे तेवढा भाव मिळत असताना काही ठिकाणी अतिवृष्टीचा फटका बसल्याने कापसाचे एकरी उत्पादन ७० ते ८० टक्क्यांनी घटले आहे. दर आहे पण, उत्पादन घटल्याने ‘कही खुशी, कही गम’ अशी उत्पादकांची अवस्था झाली आहे.

परिसरात कांदा व कापूस ही प्रमुख नगदी पिके आहेत. शेतकऱ्यांची याच पिकांवर मुख्य मदार असते. बागायती शेतात कापूस एप्रिल, मे महिन्यात तर जिरायती शेतात मान्सून आगमनानंतर लागवड केली जाते. पिके ऐन तेजीत असताना परिसरात ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात बहुतांशी ठिकाणी अतिवृष्टी झाली. सलग दहा - पंधरा दिवस कधी संततधार तर कधी मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना हैराण केले. सूर्यदर्शन देखील दुर्लभ झाले होते. शेतात पाणी साचले होते. अनेक दिवस शेतांतील पाणी निघालेच नाही. परिणामी, पिकांची वाढ खुंटली. कापसाची पाने देखील पिवळी पडली. पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. फवारणी करूनही काहीच फरक पडला नाही.

हेही वाचा: नाशिक : उड्डाणपुलावर उभ्या कंटेनरला कारची धडक; एक ठार

दिवाळीच्या पूर्वसंध्येला मोठ्या अपेक्षेने कापूस वेचणीला शेतकऱ्यांनी सुरवात केली. परंतु, कापसाचा उतारा एकरी मोठ्या प्रमाणात घसरला. एकरी दोन ते तीन क्विंटलच कापूस निघाला. दरवर्षी सात ते आठ क्विंटल कापूस एकरात निघत होता. माल खूपच कमी निघत असल्याने दर वाढले. मागणीइतका पुरवठा येत नसल्याने नऊ हजारांपर्यंत कापूस पोहचला होता. आज प्रतिक्विंटल आठ हजार रूपये दराने कापूस खरेदी केला जात आहे. मागीलवर्षी पाच ते साडेपाच हजार रूपये दर होता. दर आहे पण माल नाही अशा चक्रव्यूहात उत्पादक अडकले आहेत. शासनाकडून नुकसान भरपाई मिळते. परंतु, अनेक गावांत अतिवृष्टी होऊनदेखील त्या गावांचा नुकसान भरपाईच्या यादीत समावेश झालेला नाही, ही खंत आहे.

प्रमुख पिकाचे अतिवृष्टीमुळे उत्पादन घटले. बियाणे, लागवड, फवारणी, वेचणीचा खर्च बघता उत्पादन खर्चदेखील निघणार नाही. परिणामी, शेतकऱ्यांचे आर्थिक बजेटच यंदा कोलमडणार आहे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी.
- डॉ. कांतीलाल सुराणा, देवघट

हेही वाचा: आधार व्हेरिफिकेशनसाठी सरकारचे नवे नियम, जाणून घ्या सविस्तर

loading image
go to top