Nashik News : आधारतीर्थ आश्रमात बालकाचा खून; बालसंरक्षण कक्षामार्फत होणार आश्रमाची चौकशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alok Shingare

Nashik News : आधारतीर्थ आश्रमात बालकाचा खून; बालसंरक्षण कक्षामार्फत होणार आश्रमाची चौकशी

नाशिक : नाशिक-त्र्यंबक रोडवरील आधारतीर्थ आश्रमाला बालकल्याण समितीची मान्यताच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या आश्रमासंदर्भात यापूर्वी अनेक तक्रारी बालकल्याण समितीकडे प्राप्त झाल्याने काही वर्षांपूर्वीच बालकल्याण समितीने या आश्रमाची मान्यता रद्द केली आहे. त्यामुळे हा आश्रम नेमका कोणाच्या परवानगीने सुरू आहे, असा प्रश्‍न यानिमित्ताने समोर आला आहे. दरम्यान, पोलिसांच्या चौकशीनंतर बालकल्याण समितीमार्फतही या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. (Crime News Child murdered in Adhartirth Ashram Orphanage Nashik)

त्र्यंबकेश्रर रोडवरील अंजनेरी येथील आधारतीर्थ आश्रमात मंगळवारी (ता. २२) सकाळी अवघ्या साडेतीनवर्षीय आलोक विशाल शिंगारे (मूळ रा. उल्हासनगर) या चिमुकल्याचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. शवविच्छेदन अहवालातून त्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी त्र्यंबकेश्रवर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

आधारतीर्थ आश्रमाबाबत आणखी गंभीर बाब समोर आली असून, या आश्रमाला समाजकल्याण विभागाच्या महिला व बालकल्याण समितीची मान्यताच नाही. महिला व बालकल्याण समितीने काही वर्षांपूर्वीच या आश्रमाला देण्यात आलेली मान्यता रद्द केली होती. तसेच सदरील आश्रम बेकायदेशीर असल्याचा प्रस्ताव संबंधित विभागाला देण्यात आला होता, असे समजते. या आश्रमाबाबत यापूर्वी अनेक तक्रारी बालकल्याण समितीकडे आल्या होत्या. त्याची चौकशी व जिल्हा बालसंरक्षण कक्षामार्फत पाहणी करून त्या अहवालानुसार या आश्रमाची परवानगी रद्द करण्यात आल्याचे जिल्हा बालकल्याण अधिकारी अजय फडोळ यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

हेही वाचा: Nashik News : गोवर संसर्गाने धडकी वाढवली; आणखीन 5 नमुने हाफकिन संस्थेकडे तपासासाठी

पोलिसांच्या चौकशीनंतर या प्रकरणाची जिल्हा बालसंरक्षण कक्षामार्फतही चौकशी केली जाणार आहे. यात आश्रम नेमका कोणाच्या मान्यतेने सुरू आहे, याचीही माहिती मिळू शकेल. तसेच बेकायदेशीर आश्रम सुरू असल्यास त्याबाबतचा अहवाल शासनाच्या संबंधित विभागाला सादर केला जाणार आहे.

हेही वाचा: Measles Infection : आशादायक! मालेगावात गोवरने एकही बालमृत्यू नाही