CUET Exam 2023 : सीयुईटीच्‍या नोंदणीसाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CUET Exam

CUET Exam 2023 : सीयुईटीच्‍या नोंदणीसाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

नाशिक : देशभरातील केंद्रीय विद्यापीठासह अन्‍य विविध विद्यापीठांमध्ये पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी सीयुईटी-२०२३ परीक्षा घेतली जाणार आहे. (cuet exam 2023 Extension of deadline for registration of CUET till 30 march nashik news)

या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी सध्या नोंदणी प्रक्रिया सुरु असून, परीक्षा अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे. ३० मार्चपर्यंतच्‍या वाढीव मुदतीत विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल.

९ फेब्रुवारीपासून सीयुईटी या परीक्षेच्‍या नोंदणी प्रक्रियेला सुरवात झाली होती. या दरम्‍यान अनेक विद्यापीठे, इन्‍स्‍टिट्यूशन, स्‍वायत्त विद्यापीठे, संस्‍था यांनी देखील सीयुईटी (युजी) २०२३ मध्ये सहभाग नोंदविला आहे. अर्जदार विद्यार्थ्यास अधिकाधिक पर्याय उपलब्‍ध व्‍हावे, या उद्देशाने नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ दिलेली आहे.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

त्‍यानुसार ३० मार्चच्‍या रात्री नऊ वाजून ५० मिनिटांपर्यंत ऑनलाइन परीक्षा अर्ज भरता येईल. याच मुदतीत ऑनलाइन शुल्‍क भरायचे आहे. पुढील टप्प्यात १ ते ३ एप्रिलदरम्‍यान परीक्षा अर्ज दुरुस्‍तीची मुदत दिली जाईल. ३० एप्रिलला परीक्षा केंद्राच्‍या शहराचा तपशील जारी करण्याचे नियोजन आहे.

नोंदणी केलेल्‍या विद्यार्थ्यांना दुरुस्‍तीची संधी

यापूर्वीच परीक्षा अर्ज भरलेले पात्रताधारक विद्यार्थीदेखील परीक्षा, शिक्षणक्रम, विद्यापीठ, इन्‍स्‍टिट्यूशन, स्‍वायत्त विद्यापीठे निवडीसाठी पात्र असतील. याआधीच दहा विषय, चाचण्या निवडलेल्‍या विद्यार्थ्यांना यापूर्वीचे नोंदविलेले पर्याय बदलता येतील किंवा काढून टाकता येतील. अतिरिक्‍त चाचण्यांसाठी जादाचे शुल्‍क आकारले जाणार असल्‍याचेही स्‍पष्ट केले आहे. एका विद्यार्थ्याचे एकापेक्षा अधिक अर्ज बेकायदेशीर कृत्य ठरविले जाईल, असेही स्‍पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikexam