
बिल न भरल्याने जॉगिंग ट्रॅक अंधारात
नाशिक : शहराच्या मध्यवर्ती भागातील व सर्वाधिक गजबजलेल्या जॉगिंग ट्रॅकवरील दिवाबत्तीचे दीड लाख रुपयांचे बिल थकल्याने अखेरीस वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला. परिणामी सायंकाळनंतर जॉगिंग ट्रॅकवर अंधार असल्याने व्यायामपटूंना पुन्हा माघारी फिरावे लागण्याची वेळ आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या बांधकाम विभागाने देयके थकल्याची कबुली देताना निगरगट्टपणाचा कळस गाठला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
शहराच्या विविध भागात ५० हून अधिक जॉगिंग ट्रॅक आहे. मूळ संकल्पनेत जॉगिंग ट्रॅक बसत नसले तरी होऊ द्या खर्चाच्या नावाखाली करोडो रुपयांची उधळपट्टी होत आहे. मात्र, शहरातील जॉगिंग ट्रॅक नाशिककरांचा श्वास बनला आहे. त्यातही कृषीनगर, गोल्फ क्लब, शिखरेवाडी, संभाजी स्टेडिअम, अशोका यासारखी जॉगिंग ट्रॅक नाशिककरांच्या मनात बसली आहे. याच जॉगिंग ट्रॅकवर राजकारण, समाजकारण व शहर विकासाचे सर्वसामान्यांचे धोरणही ठरते. अनेक खेळाडू घडविणे याबरोबरच ज्येष्ठांच्या तब्येती ठणठणीत करणाऱ्या जॉगिंग ट्रॅकची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेच्या बांधकाम विभागाची आहे. परंतु, गेल्या काही दिवसात म्हणजे प्रशासकीय राजवट लागू झाल्यापासून जॉगिंग ट्रॅकला अवकळा आली आहे.
ट्रॅक नादुरुस्त असणे, झाडांना पाणी नसल्याने सुकण्याचे प्रकार होत आहे. सर्वाधिक गर्दी असलेल्या गोल क्लब जॉगिंग ट्रॅकवर संध्याकाळनंतर विजेचे दिवे लावले जात नसल्याने नागरिकांना व्यायाम न करताच परतावे लागत आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. नागरिकांनी माजी नगरसेवक प्रशांत जाधव यांच्याकडे तक्रार केल्यानंतर खरा प्रकार समोर आला.
महापालिकेच्या बांधकाम विभागाने अवघ्या दीड लाख रुपयांचे बिल न भरल्याने वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केल्याची बाब समोर आली. या संदर्भात पालिकेच्या बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला. शहर अभियंता यांनी दखल घेतली नाही. अखेरीस प्रशासक रमेश जाधव यांच्या कानावर प्रकार घालण्यात आला. आयुक्तांनी शहर अभियंता नितीन वंजारी यांचे कान टोचल्यानंतर संपर्क साधून देयके भरण्याचे आश्वासन दिले. दरम्यान तक्रारीचा द्राविडी प्राणायाम केल्यानंतर बांधकाम विभागाला जाग आली व सोमवारी थकीत बिल भरण्याचे आश्वासन देण्यात आले.
"दीड हजार कोटी रुपये वार्षिक उलाढाल असलेल्या महापालिकेकडे जॉगिंग ट्रॅकवरील वीजबिलाचे दीड लाख रुपये भरण्यासाठी पैसे नसेल तर लाजिरवाणी बाब आहे. सोमवारपासून नियमित वीज दिवे न लागल्यास आंदोलन करू."
-प्रशांत जाधव, माजी नगरसेवक.
हेही वाचा: महावितरणाची ग्रामीण रुग्णालयावर कारवाई
"दीड लाख रुपये थकल्याने आठ दिवसांपासून जॉगिंग ट्रॅक वरील वीज दिवे बंद आहे. बिल न भरल्याने दिवे बंद करण्यात आले. सोमवारी थकीत बिल भरून वीज पुरवठा सुरळीत करू."
-नितीन वंजारी, शहर अभियंता महापालिका.
हेही वाचा: वेळेवर वीजबिल भरा अन् बक्षीसही मिळवा!
Web Title: Cut Off The Power Supply Of Jogging Track Due To Bill Not Paid Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..