रक्षकच झाले भक्षकांचे शिकार !!

रक्षकच झाले भक्षकांचे शिकार !!
Published on: 
रक्षकच झाले भक्षकांचे शिकार ! भामट्याचा खाकीला चुना, तर वकिलाचा मोबाईल ‘हॅक’ करून डल्ला ... सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २५ : ‘चोराच्या उलट्या बोंबा’ वा ‘पोलिसांच्याच घरी चोरी’ या म्हणी तर आपण ऐकल्याच असतील; पण आता सायबर भामट्यांनी आणि एटीएम चोरांनी थेट ‘रक्षकांनाच’ आणि ‘कायद्याचे रक्षण करणाऱ्यांनाच’ आपले लक्ष्य बनवल्याचे समोर आले आहे. थेट एका हवालदाराला एटीएम कार्ड बदलत गंडा घातला, तर दुसऱ्या घटनेत एका ज्येष्ठ वकिलाला व्हॉट्सॲपच्या जाळ्यात ओढत त्यांच्या बँक खात्यावर डल्ला मारण्यात आला. या दोन्ही घटनांमुळे ‘रक्षकच झाले भक्षकांचे शिकार’ दिसून आले आहे. नाशिक पोलीस दलात कार्यरत हवालदार भास्कर तुळशीराम मोरे (५२, रा. आदर्शनगर, अंबड) हे गुरुवारी (ता. २२) दुपारी उत्तमनगरमधील एसबीआयच्या एटीएम केंद्रात गेले होते. तिथून पैसे काढत असताना एका अज्ञाताने हातचलाखी केली व मोरे यांचे एटीएम कार्ड हुशारीने बदलून त्यांच्यासारखेच दुसरे बनावट कार्ड त्यांना परत दिले आणि त्यांचे एटीएम पिन नंबर अगोदरच पाहिला होता. यानंतर काही वेळातच त्यांच्या खात्यातून परस्पर ९० हजार रुपयांची रक्कम काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, सहायक उपनिरीक्षक टोपले तपास करत आहेत. दुसऱ्या घटनेत प्रदीप वासुदेव गोसावी (७०, रा. प्रेस्टीज पार्क, नाशिक रोड) हे व्यवसायाने वकील आहेत. त्यांच्या मोबाईलवर २१ तारखेला सकाळी एका अज्ञात क्रमांकावरून व्हॉट्सॲप कॉल आला. फोन करणाऱ्या भामट्याने त्यांची गोपनीय माहिती सांगितल्यामुळे वकिलांचा त्याच्यावर विश्वास बसला. भामट्यांनी त्यांच्या मोबाईलवर एक एपीके फाईल पाठवली. वकिलांनी ती फाईल उघडली नसली, तरीही त्यांनी त्यांच्या इंडियन ओव्हरसीज बँकेच्या खात्यावरून नेट बँकिंगद्वारे ‘अमेझॉन पे इंडिया प्रा. लि.’च्या खात्यावर एकाच वेळी ३ लाख ८० हजार रुपये वर्ग केले. उपनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, निरीक्षक सुनील बडे तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com