Latest Political News | जिल्ह्याच्या नेतृत्वाची धुरा पुन्हा मालेगावकडे; दादा भुसेंकडे नाशिकचे पालकमंत्री पद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dada Bhuse Latest Marathi News

जिल्ह्याच्या नेतृत्वाची धुरा पुन्हा मालेगावकडे; दादा भुसेंकडे नाशिकचे पालकमंत्री पद

मालेगाव (जि. नाशिक) : मुंबई, पुणेनंतर नाशिक राज्यातील सर्वात महत्वाचा जिल्हा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (ता.२४) पालकमंञ्यांच्या नावांची घोषणा केली. यात नाशिकचे पालकमंत्रीपद बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांना मिळाल्याने जिल्ह्याच्या नेतृत्वाची धुरा पुन्हा मालेगावकडे आली आहे. पालकमंत्रीपद मिळाल्याने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. यापुर्वी दुय्यम दर्जाचे खाते मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये होती.

त्याचे परिमार्जन झाले असले तरी जबाबदारीही वाढली आहे. आगामी काळात नाशिक, मालेगाव महापालिकांच्या व जिल्ह्यातील नगरपालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत उल्लेखनीय कामगिरी करण्याचे मोठे आव्हान श्री. भुसे यांच्यासमोर असल्याने हा काटेरी मुकूटही ठरु शकतो. (Dada Bhuse appointed as Guardian Minister of Nashik Nashik Latest Political News)

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्सुकता होती. पालकमंत्री पदासाठी राधाकृष्ण विखे पाटील, गिरीष महाजन, दादा भुसे, गुलाबराव पाटील आदींची नावे चर्चेत होती. यात श्री. भुसे यांच्यावर मुख्यमंञ्यांनी विश्‍वास दर्शविला. तत्कालीन माजी मंत्री (कै.) डॉ. बळीराम हिरे, श्रीमती पुष्पाताई हिरे यांच्यानंतर जिल्ह्याचे नेतृत्व पुन्हा मालेगावकडे आले असून सत्ताकेंद्रस्थानी मालेगावचे वर्चस्व राहणार हे ‘सकाळ’चे वृत्त खरे ठरले आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात अपेक्षेप्रमाणे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार दादा भुसे यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली. पाठोपाठ उत्तर महाराष्ट्राची विभागीय आढावा बैठक मालेगावी झाली. त्याचवेळी मालेगाव व श्री. भुसे यांचे महत्व अधोरेखित झाले होते. कृषीमंत्री असताना श्री. भुसे यांनी उल्लेखनीय काम केले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील त्याचा गौरवाने उल्लेख केला होता.

त्याचवेळी श्री. भुसे यांना दुय्यम दर्जाचे खाते देवून त्यांचा अवमान केल्याचा चिमटाही त्यांनी काढला होता. श्री. भुसे यांनी कृषीमंत्रीपद स्वत:हून नाकारल्यानंतर त्यांना दुर्लक्षित खाते मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये होती. श्री. भुसे मात्र शांत होते. त्यांनी कुठलीही नाराजी प्रकट केली नाही. जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. नाशिक जिल्ह्यातून ते एकमेव मंत्री असले तरी नाशिकचे पालकमंत्री पदासाठी मोठी स्पर्धा होती. श्री. भुसे यांना पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर मालेगावी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

कॅबिनेट मंत्रीपदामुळे जिल्ह्यातील सत्ता केंद्रस्थानी मालेगावचे वर्चस्व पुन्हा सिध्द झाले आहे. राज्य निर्मितीपासून सात ते आठ वर्षाच्या कार्यकाळ वगळता मालेगावचा लाल दिवा कायम आहे. श्री. भुसे यांना आगामी काळात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत त्यांच्याकडून अपेक्षा वाढणार आहेत. अपेक्षांचे हे ओझे पेलतानाच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या व नागरिकांच्या अपेक्षा त्यांना पुर्ण कराव्या लागणार आहेत.

हेही वाचा: Crime Update : चास रोडवरील खुनाचा अवघ्या 12 तासात उलगडा

जिल्हा नियोजन मंडळ बैठकीत यापूर्वी तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ व आमदार सुहास कांदे यांच्यात निधी वाटपावरुन झालेला वाद सर्वश्रृत आहे. त्या पाश्‍र्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीचे कामकाज करताना त्यांना मोठी काळजी घ्यावी लागणार आहे. पालकमंत्रीपद आल्याने मालेगाव तालुक्याच्या विकासाबाबत व जिल्हा निर्मितीबाबत अपेक्षा उंचावल्या आहेत. त्या पूर्ण करताना श्री. भुसे यांची दमछाक होणार आहे. पालकमंत्रीपदाचा काटेरी मुकूट ते कसा सांभाळणार याविषयी आता उत्सुकता असेल.

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकसारख्या महत्वाच्या जिल्ह्याची जबाबदारी सोपवून विश्‍वास दर्शविला आहे. त्यांचा आभारी आहे. त्यांच्यासह जिल्ह्यातील जनतेचा विश्‍वास सार्थ ठरवू. जबाबदारी वाढल्याची जाणीव असून जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासन यांना सोबत घेऊन नाशिक जिल्हा विकासात व राज्यात अग्रेसर राहील असा प्रयत्न करु. सर्वांना न्याय देत पालकमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडू."

- दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक

हेही वाचा: पूर्वहंगामी द्राक्षांना खुड्याच्या मुहूर्तावर; कसमादे पट्यात किलोला दीडशेचा भाव