
दादा भुसेंना कॅबिनेट मंत्रीपद; सत्ता केंद्रस्थानी मालेगावचे वर्चस्व कायम
मालेगाव (जि. नाशिक) : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात अपेक्षेप्रमाणे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार दादा भुसे यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. नाशिक जिल्ह्यातून ते एकमेव मंत्री आहेत.
आता नाशिकचे पालकमंत्री पद कोणाला या विषयी उत्सुकता आहे. श्री. भुसे यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळताच शहर, तालुक्यातील समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून जल्लोष साजरा केला. शहरातील मोसम पूल चौक, संपर्क कार्यालय येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
कॅबिनेट मंत्रीपदामुळे जिल्ह्यातील सत्ता केंद्रस्थानी मालेगावचे वर्चस्व कायम राहिले आहे. राज्य निर्मितीपासून सात ते आठ वर्षाच्या कार्यकाळ वगळता मालेगावचा लाल दिवा कायम आहे. यामुळे जिल्हा निर्मितीसह विकास कामांसंदर्भात विभागाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. (Dada Bhuse became Cabinet Minister dominance of Malegaon at center of power nashik Maharashtra political news)
श्री. भुसे यांचा शपथविधी होताच सोयगाव नववसाहत, मोसमपुल चौक यासह विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी मिरवणुका काढून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदींचा जयघोष करत फटाक्यांची आतषबाजी केली. धर्मवीर आनंद दिघे यांना मुख्यमंत्री शिंदे व श्री. भुसे हे आदरस्थानी मानतात.
दोघे त्यांच्या समाजकार्याने प्रभावीत झालेले आहेत. तेव्हापासूनच मुख्यमंञ्यांशी श्री. भुसे यांची घनिष्ट मैत्री आहे. श्री. शिंदे यांनी केलेल्या उठावात श्री. भुसे यांनी शांतपणे महत्वाची भूमिका बजावली. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री आपल्या दारी या उपक्रमांतर्गत राज्यव्यापी दौऱ्याला मालेगावातूनच सुरुवात केली.
मुंबई, ठाणे वगळता त्यांची पहिली जाहीर सभा व नागरी सत्कार येथेच झाला. सभेबरोबरच नाशिक ऐवजी उत्तर महाराष्ट्राची महसूल विभागाची आढावा बैठक मालेगावी घेत श्री. शिंदे यांनी भुसें यांचे महत्व व आगामी काळात मालेगाव केंद्रस्थानी असेल हे अधोरेखित केले होते. त्याचवेळी भुसे यांची मंत्रीपदी निवड निश्चित मानली जात होती. आता त्यांना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळावे अशी अपेक्षा आहे.
आघाडी सरकारच्या टॉप टेन मंञ्यांमध्ये त्यांचा समावेश होता. कृषीमंत्री असताना कोरोनाच्या बिकट स्थितीतही कृषी विभागाच्या आढावा बैठकींच्या निमित्ताने त्यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला होता. यापुर्वी त्यांनी सहकार, ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून व कृषीमंत्री म्हणून अडीच वर्षे उल्लेखनीय काम केले.
यामुळे व विश्वासू सहकारी असल्याने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पुन्हा टॉपटेन मध्ये त्यांचा समावेश झाला. कृषीमंत्री पदाची जबाबदारी मिळताच त्यांनी तालुक्यासाठी कृषी विज्ञान संकुल व पाच महाविद्यालये मंजूर करवून घेतले.
यासाठी निधीची तरतूद झाली आहे. दोन महाविद्यालये सुरु झाले आहेत. राज्यात एकाच वेळी पाच महाविद्यालयांना मंजुरी मिळण्याची घटनाही प्रथमच घडली. कृषी विज्ञान संकुलााचे भुमीपूजनही मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौत्यातच पार पडले.
दादा भुसे यांची घोडदौड सुरुच
स्वातंञ्यसैनिक असलेल्या दगडू बयाजी भुसे या सामान्य शेतकरी कुटुंबात श्री. भुसे यांचा जन्म झाला. अभियंता, डिप्लोमा केल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या शासकीय सेवेत शहापूर येथे असतानाच धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याने प्रभावित होऊन ते शासकीय सेवेचा राजीनामा देऊन ते समाजकारणात आले.
जाणता राजा मित्र मंडळाचे माध्यमातून त्यांनी शहरासह तालुक्यात मोठे सामाजिक काम केले. सन २००४ च्या विधानसभा निवडणुकीत लोकाग्राहस्तव अपक्ष निवडणूक लढवून माजीमंत्री प्रशांत हिरे यांचा पराभव करून राजकारणाचा श्रीगणेशा केला.
२००९ मध्ये त्यांनी श्री. हिरे यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव केला. सन २०१४ मध्ये भाजपचे पवन ठाकरे यांचा ३७ हजार मतांनी पराभव करत हॅट्रीक केली. २०१९ च्या निवडणुकीत ते विरोधकांचे सर्वसंमतीचे काॅंग्रेसचे उमेदवार डॉ. तुषार शेवाळे यांचा ४७ हजार मतांनी पराभव करत सलग चौकार मारत विजयी झाले.
युती शासनाच्या काळात त्यांनी सहकार व ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्री पद भुषवित उल्लेखनीय काम केले. आघाडी सरकार स्थापन होताच त्यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळाली. माजी सैनिक कल्याण व कृषीमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली.
यातच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे श्री. शिंदे यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध कायम राहिले. यामुळे उठावानंतर स्थापन झालेल्या शिंदे - फडणवीस सरकार मध्ये मोठ्या चढाओढीत ते कॅबीनेट मंत्री झाले असून श्री. भुसे यांची यशाची घोडदौड सुरुच आहे.