Dasara Festival 2022 : Digitization जमान्यात आधुनिक शस्त्रांचे पूजन

Ayudh Puja on Dussehra
Ayudh Puja on Dussehra esakal

नाशिक : विजयादशमी म्हणजे रामाचा रावणावर विजय, तसाच नीतीचा अनीतीवर मात असेही मानले जाते. याच दिवशी पौराणिक काळापासून शस्त्रपूजनांचीही परंपरा आहे. जी आजही कायम आहे. मात्र, पारंपरिकता जोपासतानाच आजच्या डिजिटायझेशनच्या जमान्यात आधुनिक शस्त्रास्त्रांचेही पूजन केले जाते. तलवारी, बंदुकांचे पूजन पारंपरिकतेने केले जातेच; परंतु बदलत्या काळानुरूप अन्‌ आजच्या डिजिटायझेशनमध्ये संगणक, लॅपटॉप, वाहनांचेही पूजन त्याच श्रद्धेने केले जात आहे.

आयुधे, शस्त्रास्त्रांचे पूजन

सैन्य, पोलिस दलातर्फे त्यांच्याकडील शस्त्रास्त्रे, हत्यारांची विधिवत पूजन केली जाते. नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या शस्त्रभांडार विभागात पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या हस्ते, तर नाशिक ग्रामीण पोलिस दलात पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या हस्ते बंदुकांसह शस्त्रास्त्रांचे पूजन बुधवारी (ता. ५) केले जाणार आहे. त्याचप्रमाणे, पोलिस ठाणेनिहाय वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्ते ठाण्यातील शस्त्रास्त्रांचे पूजन केले जाणार आहे. (Dasara Festival 2022 Worship of modern weapons in age of digitization Nashik Latest Marathi News)

क्रीडा संघटनांकडूनही पूजन

क्रीडा संघटनांकडूनही त्यांच्या नित्याच्या वापराच्या साहित्यांची पूजा केली जाते. सातपूर क्लब हाउस येथे एक्सएल टार्गेट शूटर्स असोसिएशनच्या वतीने बुधवारी (ता. ५) दुपारी बाराला शूटिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या पिस्तोल, रायफल्सचे विधिवत पूजन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे यशवंत व्यायामशाळा येथेही विविध क्रीडा प्रकारांतील साहित्यांचे पूजन केले जाते. तलवारबाजी, व्हॉलिबॉल, खो-खो, कबड्डी, जिम्नॅशियम, मलखांब, कॅरम, टेनिस, टेबल टेनिस आदी संघटनांकडून खेळाडूंच्या उपस्थितीत क्रीडा साहित्यांचे पूजन केले जाते.

टूल्सचेही होते पूजन

घरोघरी अलीकडच्या काळात शस्त्रास्त्रांची जागा आधुनिक हत्यारांनी जशी घेतली आहे तशीच ज्या साहित्यांच्या वापराने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो त्या साहित्यांची वा हत्यारांची पूजाही दसऱ्याला केली जाते. गॅरेज दुकानात त्याच्याकडील वाहन दुरुस्तीसाठी वापरण्यात येणारे पान्हे, स्क्रू-ड्रायव्हर, नट-बोल्टचे पूजन केले जाते. सराफी दुकानातही दागदागिने बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांचे पूजन केले जाते.

आस्थापनांमध्ये संगणकांचे पूजन

आजचा जमाना डिजिटायझेशनचा. हिशेबांच्या चोपड्यांच्या जागा संगणकाने घेतली आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांसह बँका, खासगी आस्थापनांमध्येही संगणकांवर नित्याची कामे चालतात. दसऱ्यानिमित्ताने संगणक, लॅपटॉपचेही विधिवत पूजन केले जाते. औद्योगिक क्षेत्रात असलेल्या कंपन्यांमध्ये मशिनरींचेही पूजन केले जाते.

Ayudh Puja on Dussehra
‘Ramleela'च्या पडद्यामागील रंगभूषाकार नाना; रोज करतात 50 कलावंतांचा ‘मेकअप'

वाहनांचेही केले जाते पूजन

सायकल, दुचाकी, चारचाकी, रिक्षा, मोठी वाहनांची स्वच्छता करून दसऱ्याला विधिवत पूजन केले जाते. शाळांमध्ये वह्या-पुस्तकांसह विद्यार्थी लेखनासाठी वापरणाऱ्या पेन-पेन्सिलचेही पूजन करतात.

अनादिं सुरादिं मखादिं भवादिं, स्वरूपं त्वदीयं न विन्दन्ति देवाः ।

जगन्मोहिनीयं तु वाग्वादिनीयं, सुहृदपोषिणी शत्रुसंहारणीयं ।।

दसऱ्याच्या दिवसाबाबत अशी श्रद्धा आहे, की या दिवशी जो कोणी हे शुभ कार्य करतो, त्या व्यक्तीला त्याचे शुभ फळ नक्कीच मिळतात. याशिवाय शत्रूवर विजय मिळविण्यासाठी या दिवशी शस्त्रपूजनाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. तसेच या दिवशी प्रभू रामाने रावणाचा पराभव करून विजय मिळवला, असे म्हणतात. तसेच या दिवशी माँ दुर्गेने महिषासुराचाही वध केला होता. छत्रपती शिवाजी महाराजा यांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानीदेवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला होता.

पेशवाईतसुद्धा या सणाचे महत्त्व मोठे होते. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत. दसऱ्याच्या दिवशी कोणतेही युद्ध सुरू केले तरी विजय निश्चितच होतो, असा समज होता. त्यामुळेच या दिवशी शस्त्रपूजनही करण्यात आले आणि तेव्हापासून ही अनोखी परंपरा सुरू झाली ती आजही कायम आहे.

भारतात दसरा साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती

महाराष्ट्रात आपट्याची पाने देऊन आणि रावणदहन करून दसरा साजरा करण्यात येतो.

कुल्लूमध्ये भगवान रघुनाथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

कर्नाटकात कार्निव्हलसारखा सण साजरा केला जातो.

तमिळनाडूमध्ये देवीची पूजा केली जाते.

छत्तीसगडमध्ये निसर्गाची पूजा केली जाते.

पंजाबमध्ये दसरा हा सण नऊ दिवस उपवास आणि शक्तीची उपासना करून साजरा केला जातो.

उत्तर प्रदेशात रावणदहन केले जाते.

दिल्लीत रामलीला आयोजित केली जाते.

गुजरातमध्ये दसरा गरब्यासह साजरा केला जातो.

पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा आणि दसऱ्याचे सुंदर रंग पाहायला मिळतात.

म्हैसूरमध्ये शाही दसरा साजरा केला जातो.

Ayudh Puja on Dussehra
City Beautification Drive : आता शहर सौंदर्यीकरण अभियान; कचरा विलगीकरणावर ‘फोकस’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com