दसरा मेळाव्याला जिल्ह्यातून
समाजबांधव राहणार उपस्थित
---
हेमंत धात्रक यांची माहिती, बीडला मंगळवारी आयोजन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा केवळ वार्षिक सोहळा नसून, सामाजिक समता, वंचित घटकांचे हक्क आणि जनसामान्यांच्या आत्मसन्मानाची चळवळ आहे. हा वारसा पुढे नेण्यासाठी व सामाजिक ऐक्य अधिक दृढ करण्यासाठी जिल्ह्यातील समाजबांधव मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती हेमंत धात्रक यांनी दिली. यंदाचा दसरा मेळावा मंगळवारी (ता. २०) पाटोदा (जि. बीड) तालुक्यातील, राष्ट्रसंत भगवानबाबा यांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट येथील भगवान भक्तिगड येथे होणार आहे.
धात्रक म्हणाले, की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित, शोषित आणि वंचित घटकांना एकत्र आणून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे ऐतिहासिक कार्य केले. हीच वैचारिक आणि सामाजिक परंपरा पंकजा मुंडे यांनी अखंडितपणे पुढे सुरू ठेवली. हा मेळावा कोणत्याही राजकीय पक्षापुरता मर्यादित नसून, सर्वसामान्य जनतेच्या भावना आणि सामाजिक न्यायाचे प्रतिनिधित्व करणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. जिल्ह्यातील समाजबांधवांनी या परंपरेचे महत्त्व ओळखून सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणप्रसारक संस्थेचे सरचिटणीस आणि नामको बँकेचे माजी अध्यक्ष हेमंत धात्रक, आमदार किशोर दराडे, आमदार गोकुळ गिते, संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, गणेश गिते, उदय घुगे, उदय सांगळे, दामोदर मानकर, नारायणराव काकड, प्रकाश घुगे, प्रल्हाद काकड आणि शरद बोडके आदींनी केले आहे.