esakal | गौरवास्पद! नाशिकच्‍या दत्तू भोकनळची अर्जुन पुरस्‍काराला गवसणी; कसा होता आजवरचा प्रवास? वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Dattu bhokanal will receive arjuna award nashik marathi news

शालेय शिक्षणापासूनच कष्ट केलेल्‍या दत्तूचा प्रवास संघर्षमयी राहिला आहे. कुटुंबासमोरील अडचणीचा साक्षीदार राहिलेला दत्तू २०१२ मध्ये सैन्‍य दलात भरती झाला. लष्करात दाखल होईपर्यंत दत्तूला रोईंग खेळाविषयी माहिती नव्‍हती. 

गौरवास्पद! नाशिकच्‍या दत्तू भोकनळची अर्जुन पुरस्‍काराला गवसणी; कसा होता आजवरचा प्रवास? वाचा सविस्तर

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : क्रीडा क्षेत्राशी निगडीत विविध पुरस्‍कारांची घोषणा शुक्रवारी (ता.२१) होताच नाशिक जिल्‍ह्‍यासह उत्तर महाराष्ट्रात आनंदोत्‍सव सुरू झाला. प्रतिष्ठेचा असा अर्जुन पुरस्‍कार नाशिकच्‍या दत्तू भोकनळ याला जाहीर झाल्‍याने क्रीडा प्रेमींमध्ये आनंदाची लहर पसरली. ऑलिंम्‍पिकपटू कविता राउत-तुंगारनंतर नाशिक, उत्तर महाराष्ट्रात अर्जुन पुरस्‍काराला गवसणी घालणारा दत्तू हा दुसरा खेळाडू ठरला आहे. हालाखीच्‍या परीस्‍थितीतून पुढे येत दत्तूने आंतरराष्ट्रीय स्‍तरावर छाप सोडली आहे. सध्या तो लष्करात कार्यरत आहे. 

तळेगाव रोही (ता.चांदवड) येथील मुळचा दत्तू भोकनळ याने अत्‍यंत प्रतिकुल परीस्‍थितीतून आजवरचा प्रवास केलेला आहे. अत्‍यंत सामान्‍य कुटुंबातील दत्तूचे वडील विहीर खोदायचे काम करायचे. शालेय शिक्षणापासूनच कष्ट केलेल्‍या दत्तूचा प्रवास संघर्षमयी राहिला आहे. कुटुंबासमोरील अडचणीचा साक्षीदार राहिलेला दत्तू २०१२ मध्ये सैन्‍य दलात भरती झाला. लष्करात दाखल होईपर्यंत दत्तूला रोईंग खेळाविषयी माहिती नव्‍हती. सुभेदार कुदरत यांनी दत्तूची शरीरयष्टी बघून खेळाची गोडी लावली. २०१४ मध्ये पुण्यात झालेल्‍या राष्ट्रीय स्‍पर्धेत दोन सुवर्णपदके मिळविली. पुढे पात्रता फेरीत चांगली कामगिरी करतांना ऑलिंम्‍पिकचे तिकीटही मिळविले. रिओ (ब्राझील) येथे २०१६ मध्ये झालेल्‍या ऑलिंम्‍पिक स्‍पर्धेत दाखल झाल्‍यानंतर उपउपांत्‍य फेरीपर्यंत दत्तूने मजल मारली होती. ऑलिंम्‍पिकमध्ये पदक मिळविण्याचे स्‍वप्‍न थोडक्‍यात हुकले होते. 

हेही वाचा > अचानक सायरनचा तो धडकी भरविणारा आवाज..नागरिकांत घबराट अन् सुटकेचा निश्वास! काय घडले नेमके?

 ..तरी शेतात गाळला घाम 

गावाच्‍या मातीशी नाळ जुळलेला रोईंगपटू दत्तू भोकनळ लष्करी सेवेत सुट्यांकरीता गावी आल्‍यानंतर वडिलोपार्जित जिरायत शेतीत मक्‍याची सोंगणी केली. आंतरराष्ट्रीय स्‍तरावर नावलौकिक मिळविलेला असतांना कुठलीही लाज न बाळगता शेतीत घाम गाळतांना दत्तूने कामात आपल्‍या कुटुंबियांना हातभार लावला. तर सध्याच्‍या कोरोनाच्‍या काळात फवारणी करतांनाचे त्‍याचे छायाचित्रदेखील पुढे आले होते. 

हेही वाचा > शिवप्रेमींत हळहळ; शिवप्रेमी रितेशची किल्ल्यावरील 'ती' सेल्फी शेवटची ठरली, काय घडले?

शिवछत्रपती पुरस्‍काराने झालाय गौरव 

राज्‍य शासनाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्‍कार असलेल्‍या शिवछत्रपती पुरस्‍काराने दत्तूचा २०१७ मध्ये गौरव करण्यात आला आहे. याशिवाय अनेक संस्‍थांकडून दत्तूला त्‍याच्‍या कार्यासाठी गौरविण्यात आले आहे. जिल्‍ह्‍यातील नामांकित अशा मविप्र मॅरेथॉन या राष्ट्रीय स्‍तरावरील स्‍पर्धेच्‍या पारितोषिक वितरण समारंभास पाहुणा म्‍हणून त्‍याला आमंत्रित केले आहे. 

संपादन - रोहित कणसे

loading image
go to top