असा ही एक अवलिया घरफोड्या....

असा ही एक अवलिया घरफोड्या....
Published on: 
रविवार विशेष : एक शून्य शून्य ........... रमेश सोनवणे, सहायक पोलिस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त) फोटो : H35022 .............. चोरीतून श्रीमंती, दानधर्मातून माणुसकी जपणारा घरफोड्या ----------------------------------------------- काही दिवस दिवसा रेकी करायची अन् दिवसाच घरफोडी करून लाखोंचा मुद्देमाल लंपास करायचा. दाराला कसेही लॉक असो, काही सेकंदात ते लॉक तो सहज उघडायचा, ही त्याची खासीयत. एवढेच नव्हे तर, घरफोडी केली अन्‌ त्याच शहरात तो पोलिसांकडून पकडला गेला तर पुन्हा त्या शहरात तो कधीही चोरी करायला यायचा नाही. असा हा घरफोड्या १९८९ मध्ये इंदिरानगरच्या हद्दीत घरफोडी करताना अंबड पोलिसांच्या हाती लागला होता. - नरेश हाळणोर सन १९८९ सालच्या हिवाळ्यातील दिवस. इंदिरानगर हद्दीतील बंगल्यात राहणारी महिला तिच्या मुलाला शाळेत सोडविण्यासाठी पायीच निघाली होती. घरापासून काही अंतर गेल्यानंतर मुलाच्याच वर्गातील मुलगा आणि त्याचे पालकही शाळेकडे जात होते. त्यांनीच महिलेच्या मुलालाही शाळेत सोडतो म्हणून दुचाकीवरून नेले. त्यामुळे महिला अर्धा रस्त्यातून माघारी फिरली. घराच्या दिशेने आली असता, तिने जाताना बंगल्याच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावले होते. पण आता तिला दरवाजा उघडा दिसला. तिने क्षणात ओळखले, की घरात चोर शिरला आहे. तिने क्षणाचाही विलंब न लावता, दरवाजाला बाहेरून कडी लावली आणि शेजाऱ्यांकडे गेली. त्यांना घरात चोर शिरल्याची माहिती दिली. त्यांनी लागलीच अंबड पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. (त्या वेळी इंदिरानगर पोलिस ठाणे नव्हते.) ‘साहेब, मारायचे नाही....’ अंबड पोलिस ठाण्याशी फोनवरून संपर्क साधून माहिती दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये अंबड पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक दाखल झाले. अंबड पोलिस ठाण्यातील तत्कालीन पोलिस हवालदार रमेश सोनवणे यांना सदरील महिलेने माहिती दिली. त्यानंतर सोनवणे यांचे सहकाऱ्यांनी दरवाजा उघडला तर, घरफोड्या घरातील सोफा सेटवर आरामात बसलेला होता. त्याने पोलिसांना पाहून पलायन करण्याचा ना प्रयत्न केला, ना कसली विनवणी केली. तो पोलिसांना पाहून शांत उभा राहिला. त्याला असे पाहून सोनवणे यांच्यासह सहकारी अवाकच झाले. तो काहीही बोलला नाही. अगदी शांतपणे तो पोलिसांकडे पाहत होता. सोनवणे यांनी घरात नजर फिरवली. त्याने घरातील कपाटाचेही लॉक उघडलेले होते. सोन्याचे दागिनेही काढलेले होते. पण दरवाजा बाहेर लॉक झाल्याने त्याला बाहेर पडायला कोणताही मार्ग नसल्याने त्याने लॉकरमधील काढलेले दागिने तसेच ठेवलेले होते. सोनवणे यांनी त्याच्याकडे कटाक्ष टाकताच, त्याने ‘साहेब, मारायचे नाही... मी सारं काही सांगतो...’ असे म्हणताच, त्यांना आणखी एक धक्काच बसला. एरवी, चोर पोलिसांच्या हाती लागला तर आधी पळण्याचा प्रयत्न करतो, नाहीतर पोलिसांशी हुज्जत घालतो. यात त्याने काहीच केले नव्हते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिस गाडीत बसवले अन्‌ अंबड पोलिस ठाण्यात आणले. दिवसा रेकी, दिवसाच घरफोडी रामकृष्ण रामनाथ धनू असे त्या घरफोड्याचे नाव. तो मूळचा कोकणातला. पण ठाण्यात स्थायिक होता. तो एकटाच घरफोड्या करायचा. त्याला कोणीही साथीदार नव्हते. दिवसा तो शहरातील उच्चभ्रू वसाहतीत फिरायचा. काही दिवस काही घरांवर नजर ठेवायचा. काही घरांवर बारीक नजर ठेवायचा. घरातील माणसे कधी बाहेर जातात, परत कधी येतात. कोणत्या घराला कुलूप लावून बाहेर जातात. काही दिवस अशी रेकी केल्यानंतर, नेमके घर हेरायचा. इंदिरानगरमध्येही त्याने तेच केले होते. त्या बंगल्यावर त्याने चार दिवस नजर ठेवली होती. ती महिला मुलाला शाळेत सोडण्यासाठी जाते, हे त्याने नेमके हेरले होते. पण नेमके त्याच दिवशी ती महिला लवकर परतल्याने त्याचा डाव फसला आणि तो पोलिसांच्या हाती लागला. अंबड पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक के. एस. भारती यांनी रामकृष्ण धनूकडे चौकशी केली असता, त्यांना त्यांच्या पोलिस कारकिर्दीत कधीही न आलेला अनुभव आला. चोरांनाही इमान असतो, याप्रमाणे हा घरफोड्या त्यांच्या हाती लागला होता. चौकशीत धनूचे ठाण्यासह नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, पुणे या शहरांमध्ये घरफोड्या केल्याची कबुली दिली. पण, घरफोड्या करीत असताना, ज्या शहरात तो पोलिसांच्या हाती लागायचा, त्या शहरात तो कधीही पाऊल टाकत नव्हता, असेही त्याने सांगितले. हे ऐकून भारती अन्‌ हवालदार सोनवणे यांना नवलच वाटले. उच्चभ्रू राहणीमान अन्‌ दानधर्मही हवालदार सोनवणे यांच्या पथकाने धनूच्या ठाण्यातून घरावर छापा टाकला. चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यासाठी ही धाड होती. ज्या वेळी सोनवणे आणि त्यांचे पथक धनूच्या ठाण्यातील एका अपार्टमेंटमधील घरी पोहोचले, त्या वेळी ते घर पाहून पोलिसांनी तोंडात बोटच घातले. अतिशय आलिशान घर. त्याला दोन मुली होत्या. त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होत्या. त्यांचेही राहणीमान एखाद्या श्रीमंत घरातील मुलींनाही लाजवेल असे होते. एवढेच नव्हे तर, घरात असलेल्या सुख-सोयीसुविधा अचंबित करणाऱ्या होत्या. हे सारे पाहून पोलिसांनी त्याच्याकडे नजर टाकली असता, त्याने स्पष्ट सांगितले, मी जे करतो त्याचा माझ्या कुटुंबीयांना जगातले सर्व सुख मिळावे यासाठी करतो. ती माझी जबाबदारीच आहे, असेही म्हणाला. एवढेच नव्हे, त्याने शिर्डीत अनेक घरफोड्या केल्याचे पोलिसांना सांगितले. परंतु या घरफोडीतल्याच रकमेतून त्याने शिर्डीत भाविकांसाठी पाणपोईही बांधून दिली होती. शिर्डीत येणाऱ्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, हा त्याचा हेतू होता. असे त्याने पुण्यातही केले होते. हे ऐकून तर सारे अबोलच झाले. बोटीचा मालक व्हायचेय धनू मूळचा कोकणातला. त्याला स्वतःची आलिशान अशी बोट घ्यायची होती. पण तेवढे पैसे त्याच्याकडे नव्हते. त्यासाठी तो मुंबईत आला. पण त्याला मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातून कसेबसे भागत होते. त्यातून त्याचे स्वप्न साकारणे अशक्य होते. यासाठीच त्याने घरफोड्या करणे सुरू केले. त्याच्याकडे एकच कला होती, ती म्हणजे कसेही लॉक असो ते तो अवघ्या काही सेकंदात उघडू शकत होता. पोलिस निरीक्षक भारती यांनी त्याला पोलिस ठाण्यातील एका मजबूत लोखंडी कपाटाचे लॉक उघडून दाखविण्याचे आव्हान दिले. धनूने ते अगदी हसत हसत स्वीकारले आणि त्यांच्यासमोर त्याने स्क्रु-ड्रायव्हरच्या साहाय्याने अवघ्या काही सेकंदात उघडून दाखविले. भारती त्याच्याकडे पाहतच राहिले. मुद्देमालासाठी नवसारी धनू घरफोड्यातून चोरलेले सोन्याचे दागिने नवसारीतील (गुजरात) एका सराफाला विकायचा. तो पोलिसांना चौकशीमध्ये सगळी माहिती देत होता. कोणतीही माहिती त्याने लपवून ठेवली नाही. चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यासाठी तत्कालीन पोलिस अधीक्षकांच्या परवानगीने अंबडचे तत्कालीन पोलिस निरीक्षक भारती यांनी एका उपनिरीक्षकांसह तपासी अधिकारी म्हणून हवालदार रमेश सोनवणे यांना नवसारीला जाण्याचे आदेश दिले. त्यानुसार, एक पोलिस पथकच घरफोड्या धनूला घेऊन नवसारीच्या दिशेने निघाले. पोलिस वाहनातून जात असताना वाटेत नदी लागली अन्‌ धनूने नदीत पोहण्याची इच्छा व्यक्त केली. उपनिरीक्षकाने नकार दिला. धनूने परत विनवणी केली असता, हवालदार सोनवणे यांनी धनूच्या इमानदारीवर विश्वास दाखविला. सोनवणे यांनाही पोहता येत असल्याने दोघेही पाण्यात उतरले. पोहण्याच्या बहाण्याने धनू पळून जाण्याची शक्यता असल्याने उपनिरीक्षक सावधगिरी बाळगत होते. तर, सोनवणे हे धनूच्या सोबतच पोहोत होते. हे पाहून धनूने, मी पळून जाणार नाही साहेब, नका दमू’ असे म्हणाला. तर ‘तू पळणार नाही हे माहिती आहे. पण तुझ्यापेक्षा चांगला मी पोहतोय हे तुला माहिती झाल्याने तू आता पळू नाही शकणार’ असे सोनवणे म्हणाले. नवसारीत पोहोचल्यावर ठरल्याप्रमाणे, धनूने त्या सराफाला महाराष्ट्रातून सोने खरेदीसाठी गिऱ्हाईक आणल्याचे सांगितले. पोलिसांनी सापळा रचला होता. सराफाने सुरुवातीला आढेवेढे घेतले पण नंतर त्याने धनूवर विश्वास दाखविला. गिऱ्हाईक म्हणून आलेल्या पोलिसांना त्याने बोलावले. सोनवणे व साथीदारांनी चाणाक्षपणे सोन्याची पारख केल्यानंतर महाराष्ट्र पोलिस असल्याचे सांगितले. चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यासाठी आल्याचे सांगितले. सराफाने काही वेळ शांतता बाळगली. त्यानंतर त्याने कोणालातरी फोन केला. त्यानंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांमध्ये सराफाच्या दुकानाबाहेर पाचपन्नास लोकांचा जमाव गोळा झाला. ते पाहून पोलिसांना धक्का बसला. पोलिसांनी मुद्देमाल तर सोडाच, धनूला परत घेऊन जाणे अशक्य झाले होते. हवालदार सोनवणे यांनी सराफाच्याच दुकानातील फोनवरून अंबड पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक भारती यांच्याशी संपर्क साधून तेथील परिस्थितीची माहिती दिली. भारती यांनी ही माहिती तत्कालीन पोलिस उपअधीक्षकांना दिली. त्यांनी पोलिस अधीक्षकांना दिली. अधीक्षकांनी पोलिस महासंचालकांना दिली. असे चक्र फिरल्यानंतर काही वेळातच, सराफाच्या दुकानात नवसारी पोलिस पोहोचले. त्यातील एका पोलिसाने हवालदार सोनवणे यांच्याशी गप्पागोष्टी करीत असताना, हा सराफ गुजरात सरकारमधील एका मंत्र्याचा नातलग आहे. तो चोरीचे सोने खरेदी करतो हे साऱ्या गुजरात पोलिसला ठाऊक आहे पण आतापर्यंत कोणीही त्याच्याकडून ते जप्त करू शकले नाही. त्यामुळे तुम्हीही काहीही न करता गुपचूप निघून जा. आमच्या साहेबाला पोलिस अधीक्षकाने येथे पाठवले असून, तुम्हाला सहीसलामत बाहेर पोहोचवायचे, अशी माहिती दिली. त्यानंतर, नाशिकमधून पुन्हा एक फोन आला. त्या वेळी पोलिस निरीक्षक भारती यांनी नाशिकच्या पथकाला सांगितले की, नवसारी पोलिस तुम्हाला सहीसलामत महाराष्ट्राच्या सीमेत आणून सोडतील. मुद्देमाल दोन दिवसात मिळणार आहे. घरफोड्या धनूला घेऊन तुम्ही सुरक्षितपणे तेथून बाहेर पडा.’ त्यानुसार, नाशिकचे पथक मुद्देमाल न घेता घरफोड्या धनूला घेऊन बाहेर पडले. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी चोरीच्या गुन्ह्यातील सुमारे दोन-अडीच लाखांचे चोरीचे सोन्याचे दागिने अंबड पोलिस ठाण्यात पोहोच झाले होते. असा हा अवलिया घरफोड्या नाशिकच्या हद्दीत पुन्हा कधीच आला नाही की पोलिसांच्या हातीही लागला नाही. या मजकुराला सकाळच्या शैलीनुसार आकर्षक शीर्षक व थोडक्यात समर्पक एंट्रो करून द्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.