Nashik News : DCPS धारक शिक्षक वाऱ्यावर; शिक्षक दरबारात मांडल्या व्यथा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Members of the Pension Sangharsh Coordinating Committee giving a statement of demands to Teacher MLA Kishore Darade.

Nashik News : DCPS धारक शिक्षक वाऱ्यावर; शिक्षक दरबारात मांडल्या व्यथा

दिंडोरी (जि. नाशिक) : जिल्ह्यात मार्च २१ अखेर डीसीपीएस खात्याची रक्कम एनपीएस खात्यात वर्ग होणे आवश्यक असताना तसे न झाल्याने गेल्या दोन वर्षापासून डीसीपीएस रकमेच्या व्याजाचे शिक्षकांचे मोठे नुकसान झालेले आहे.

या व्याजाची भरपाई देण्याची मागणी आमदार किशोर दराडे यांच्या शिक्षक दरबारात पेन्शन संघर्ष समन्वय समितीतर्फे करण्यात आली. (DCPS holder teacher problem presented in teachers court Nashik News)

शिक्षक आमदार किशोर दराडे, शिक्षण उपसंचालक चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी व शिक्षण विभागाचे अधिकारी कार्यालयीन अधीक्षक आदी उपस्थित होते. नाशिक जिल्हा पेन्शन संघर्ष समितीतर्फे सचिन वडजे यांनी शिक्षक दरबारात या संदर्भात प्रश्न मांडले.

दोन वर्षात प्रत्येकी हजारो रुपयांचे व्याज डीसीपीएस धारकांचे बुडाले आहे. या रकमा एनपीएसमध्ये वर्ग न होण्याचे कारण शोधून विलंब का झाला याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. अनेक डीसीपीएस धारकांच्या हिशोबात त्रुटी असून त्या दूर करण्यासंदर्भात शिक्षकांनाच पुरावे गोळा करावे लागत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.

इतर जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यात आलेल्या डीसीपीएस धारकांचा हिशोब जिल्हा परिषद स्तरावरून संबंधित जिल्हा परिषदांकडे मागवण्यात यावा, प्रत्येक डीसीपीएस धारकाला वैयक्तिक संबंधित जिल्हा परिषदेकडे हिशोबासाठी पाठवण्यात येऊ नये अशी विनंतीही करण्यात आली.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

प्राथमिक शिक्षकांचे पगार खूप उशिराने होत असून पगार दरमहा एक तारखेस होण्यासाठी शिक्षक आमदारांनी लक्ष घालावे अशी मागणीही करण्यात आली.

तसेच कोविड काळात मृत्यू पावलेल्या शिक्षकांना ५० लाखाचे सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात यावा. मृत डीसीपीएस धारकांचे जमा रक्कम तात्काळ वारसास परत करण्यात यावी, दहा लाखाचे सानुग्रह अनुदान विनाअट देण्यात यावे आदी मागण्याही करण्यात आल्या.

पेन्शन संघर्ष समन्वय समितीतर्फे सचिन वडजे, प्रदीप पेखळे, किरण शिंदे, नियाज शेख आदींनी चर्चेत सहभाग घेऊन आमदार किशोर दराडे यांना निवेदन सादर केले. आमदार दराडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना या प्रश्नावर व निवेदनावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी सूचना केल्या.

टॅग्स :Nashikteachersalary