
NMC News: होर्डिंगवर जिओ टॅगिंग लावण्याचा निर्णय; 150 होर्डिंगधारकांकडून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट सादर
NMC News : शहरात उभारण्यात आलेल्या ८४५ होर्डिंगची महापालिकेच्या वेबसाइटवर नोंद होऊन निश्चित स्थळ शोधण्यासाठी जिओ टॅगिंग लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून मोजमापाचीही नोंद घेतली जाणार आहे.
ऑगस्टअखेर जिओ टॅगिंग लावण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून, त्याचबरोबर स्टॅबिलिटी सर्टिफिकेट सादर करताना होर्डिंगच्या मोजमापाचीही त्यावर नोंद करण्याच्या सूचना महापालिकेचे विविध कर विभागाचे उपायुक्त श्रीकांत पवार यांनी दिले.
दरम्यान, स्टॅबिलिटी सर्टिफिकेट सादर करण्याच्या सूचना देऊनही प्रतिसाद न दिल्याने नोटिसा पाठविण्यात आल्यानंतर आता जवळपास दीडशे होर्डिंगधारकांनी स्टॅबिलिटी सर्टिफिकेट घेतल्याचा दावा उपायुक्त पवार यांनी केला. (Decision to apply geo tagging on hoardings Submission of stability certificate from 150 hoarding holders nmc nashik news)
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत होर्डिंग कोसळून दुर्घटना घडल्याने यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महापालिका हद्दीमधील होल्डिंगच्या स्टॅबिलिटी सर्टिफिकेट तपासणीच्या सूचना दिल्या.
शासनाच्या सूचनेनुसार महापालिकेने तत्काळ कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु विविध कर विभागात अनेक वर्षांपासून एकाच टेबलवर काम करणाऱ्या काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे होर्डिंग मालकांशी लागेबांधे असल्याने कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात आली.
परंतु नव्याने पदभार घेतलेल्या प्रशासन उपायुक्त श्रीकांत पवार यांनी शासनाच्या पत्राची गंभीर दखल घेत महापालिकेकडे नोंद असलेल्या ८४५ होर्डिंगधारकांना नोटिसा पाठवल्या. परंतु होर्डिंगधारकांच्या मुजोरीचा नमुना उपायुक्तांना बघायला मिळाला.
८४५ पैकी अवघे १३ होर्डिंग स्टॅबिलिटी सर्टिफिकेट महापालिकेकडे सादर करण्यात आले. ‘सकाळ’ने या प्रकरणावर प्रकाश टाकल्यानंतर होर्डिंगधारकांसह कर विभागातील कर्मचाऱ्यांची पळापळ झाली. आज अखेरपर्यंत जवळपास दीडशे होर्डिंगधारकांनी महापालिकेच्या विविध कर विभागाकडे स्टॅबिलिटी सर्टिफिकेट सादर केले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
होर्डिंगवर जिओ टॅगिंग
शहरात अधिकृतपणे उभारण्यात आलेली होर्डिंग ज्या ठिकाणी परवानगी दिली तेथेच उभारण्यात आली आहे का, हे तपासण्यासाठी जिओ टॅगिंग लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑगस्टअखेर जिओ टॅगिंग लावण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
होर्डिंग्जची मापे तपासणार
शहरात लावण्यात आलेल्या होर्डिंगची मापे तपासणी केली जाणार आहेत. महापालिकेच्या विविध कर विभागाकडे परवानगी घेताना दर्शविलेले माप व प्रत्यक्षात जागेवर असलेले होर्डिंगचे माप यात तफावत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने त्या अनुषंगाने स्टॅबिलिटी सर्टिफिकेट सादर करताना मापाचेदेखील उल्लेख करणे आता बंधनकारक आहे.
त्याचबरोबर अपार्टमेंट्स सर्टिफिकेट सादर केल्यानंतर होर्डिंगचे मोजमाप तसेच काँक्रिट पिलरचेदेखील माप व तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती विविध कर उपायुक्त पवार यांनी दिली.
"ऑगस्टअखेर शहरातील उभारण्यात आलेल्या होर्डिंगचे मोजमाप करण्याबरोबरच होर्डिंगला जिओ टॅगिंग लावले जाणार आहे. जेणेकरून मंजूर झालेल्या ठिकाणावरच होर्डिंग लावले आहे की नाही, ही बाब तपासता येईल."- श्रीकांत पवार, उपायुक्त, विविध कर, महापालिका