Latest Marathi News | लेखानगरची चौपाटी बंद करण्याचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC News

Nashik : लेखानगरची चौपाटी बंद करण्याचा निर्णय

नाशिक : औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल मिरची जवळ खासगी ट्रॅव्हल बसला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एका पत्राचा संदर्भ देत लेखानगर येथील बहुचर्चित खाद्यपदार्थांची चौपाटी हटविण्याचा निर्णय घेतला असून, येथील फेरीवाला क्षेत्रदेखील रद्द करण्यात आले आहे. (Decision to close Lekha Nagar Chowpatty Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Traffic Rules Penalty : बेशिस्त वाहनचालकांकडून 10 कोटी 13 लाखांचा दंड वसूल

नाशिक औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल मिरची चौफुलीवर ८ ऑक्टोबरला खासगी ट्रॅव्हल बसला अपघात होऊन यात आगीत होरपळून १२ नागरिकांचा मृत्यू झाला. घटनेची देशभर चर्चा झाली. प्रशासकीय यंत्रणा या घटनेमुळे हादरल्याने महामार्गाच्या सुरक्षितता संदर्भात विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्याच अनुषंगाने सध्या प्राप्त होत असलेली व जुन्या पत्रावर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे.

त्यानुसार महामार्गाला खेटून असलेल्या लेखानगर येथील चौपाटी आता बंद करण्याचा निर्णय घेतला असून, पाथर्डी फाटा येथे पर्यायी जागा दिली जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेदेखील महापालिकेला या संदर्भात सूचना दिली होती. त्याचा आधार घेत दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत येथील फेरीवाला क्षेत्र रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अतिक्रमण उपायुक्त करुणा डहाळे यांनी दिली.

लेखानगर व स्टेट बँक येथील फेरीवाला क्षेत्रात बसत असलेल्या विक्रेत्यांची रीतसर नोंदणी झाली असून, या सर्वांना पाथर्डी फाट्याकडून अंबडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती उपायुक्त डहाळे यांनी दिली.

हेही वाचा: Bus Fire Accident : DNA अहवाल प्राप्तीनंतर तीनही मृतदेह नातलगांच्या स्वाधीन